'थांबून काय करायचे ? गेलेले बरे. पाऊस कमी झाला आहे.' म्हणून तो उठला.

'माझी शाल अंगावर घेऊन जा. तू पाठवलेली शाल. थांब, मी आणते.'

ती पटकन् घरात गेली. तिने शाल आणली. ती शाल हातातच घेऊन तो निघाला.

'पांघर, अंगावर घे.' ती दारातून म्हणाली.

तो काही बोलला नाही. आपली शालही तिने परत केली; जणू आजवरचे प्रेम परत केले असे त्याला वाटले. त्याच्या हातातच शालीची घडी होती. तो तसाच जात होता. हॉटेलमध्ये तो गेला. शून्य मनाने तो अंथरुणावर पडला आणि मिरीही रात्री अंथरुणातच अश्रुमोचन करीत होती. आज सारी लौकरच झोपली. मिरीला झोप नव्हती. पाऊस थांबला होता. आकाशात पुन्हा चंद्र मिरवत होता. समुद्रावर जावे असे मिरीच्या मनात आले. ती उठली. ती दरवाजाजवळ गेली. तो दारावर बाहेरून थाप मारली. तिने दार उघडले.

'डॉक्टर, तुम्ही कुठे ? वादळात सापडले होता की काय ? आत येता ?'

'मी जातो. त्या अपरिचित पाहुण्याने तुझ्यासाठी हे पत्र दिले आहे. मी जातो.'

डॉक्टर गेले. मिरी दार लावून वरती गेली. तिने दिवा लावला. ते पत्र तिने फोडले. काय होते त्या पत्रात ?

'मिरी, माझ्या मुली, प्राणाहून प्रिय अशा माझ्या कन्यके, तुला काय लिहू ? तू का तुझ्या पित्याचा तिरस्कार करशील ?

मी एक हतपतित मनुष्य आहे. तू माझी मुलगी. आज किती वर्षांनी मी तुला पाहतो आहे. त्या वेळेस तू दोन वर्षांची होतीस आणि तुझी माझी ताटातूट झाली आहे. ऐक, तुझ्या दुर्दैवी पित्याची सारी कथा ऐक. ज्या कृष्णचंद्रांकडे तू राहतेस, त्यांची पहिली पत्‍नी होती. ती विधवा होती. त्या विधवेच्या पूर्व संसारातील मी एक लहान मुलगा होतो. शांताराम माझे नाव. कृष्णचंद्रापासून माझ्या आईला मुलगी झाली. तिचेच नाव सुमित्रा. ती जन्मल्यापासून आईची प्रकृती बिघडली. बरीच वर्षे ती अंथरुणाला खिळून होती. सुमित्रा नि मी एकत्र वाढत होतो. शिकत होतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. पुढे आई मरताना आम्हांला म्हणाली, 'एकमेकांस अंतर देऊ नका.' ती सुमित्राला म्हणाली, 'शांतारामला कोणी नाही. तुझ्या पित्याचे त्याच्यावर प्रेम नाही. तू त्याची रक्षणकर्ती देवता हो, प्रकाशदात्री देवता हो.' मरताना आईने आपली अंगठी माझ्या बोटात घातली. माझ्या पित्याने तिला ती दिलेली होती. माझ्या आईबापांची एकमेव अशी ती आठवण होती. प्राणाहून अधिक मी मी त्या अंगठीला जपत असे.

सुमित्राचे वडील मला मारहाण करीत. बोलत. परंतु, आई गेल्यावर त्यांनी माझे शिक्षणही थांबविले. त्यांच्या दुकानात मी नोकरी करू लागलो. सुमित्रा नि मी एकत्र बसता कामा नये, एकमेकांशी बोलता कामा नये, अशी किती तरी बंधने त्यांनी घातली. तरी आम्ही चोरून बोलत असू. एके दिवशी टेबलाजवळ आम्ही बोलत होतो. सुमित्राचे वडील आले. त्यांनी काठी उगारली. मी पैशाची अफरातफर केली, असा त्यांनी आरोप केला. मला संताप आला. मी एक बाटली त्यांच्या तोंडावर फेकली. सुमित्रा आडवायला गेली. परंतु ती बाटली अ‍ॅसिडची होती. सुमित्राच्या डोळयांत अ‍ॅसिड गेले. ती ओरडली. एका क्षणातच काय झाले ते माझ्या लक्षात आले. मी दु:ख, संताप यांनी वेडा होऊन घरातून पळून गेलो. सुमित्रा आंधळी झाली. तिला मी तोंड कसे दाखविणार ?

एके दिवशी सायंकाळी जरा अंधार पडल्यावर हळूच मागील दाराने मी घरात जात होतो. तो स्वयंपाकीणबाईंनी मला पाहिले.

'कोठे चाललास चोरा ?' ती म्हणाली.

'सुमित्राकडे. शेवटचा निरोप घ्यायला.' मी म्हटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel