तिकडे चारू बाहेर होता. फुले तोडून गुच्छ करीत होता. चित्राने चारूकडे पाहिले. त्याने तिच्याकडे पाहिले. कोणी बोलले नाही; परंतु थोड्या वेळाने मला छान करता येतो गुच्छ. मी करू का?’ चित्राने विचारले.

‘परंतु तुम्हाला देण्यासाठी तर मी करीत आहे. पाहुणेमंडळींचे स्वागत करायला हवे. बाबांनी मला सांगितले, गुच्छ कर म्हणून.’

‘तुम्ही आम्हाला गुच्छ द्या, आम्ही तुम्हाला देऊ.’

‘परंतु आमचीच फुले घेऊन आम्हाला देणार वाटते? तुमच्याकडे बोलवा व मग गुच्छ.’

‘आम्ही बोलावले तर तुम्ही याल?’

‘परंतु तुमचे वडील मामलेदार. खेड्यातील लोकांना मामलेदार का घरी पाहुणचारास बोलावतील?’

‘माझे बाबा तसे नाहीत. ते साधे आहेत. शेतकरी घरी आले, तरी त्यांना बैठकीवर बसवतात. त्यांना पानसुपारी देतात. आम्ही तुम्हाला बोलवू हा; परंतु आधी सांगा, मी करु का गुच्छ? एक तरी करत्येच. तुम्हाला हो द्यायला. तुमच्या वडिलांना द्यायला मला भीती वाटेल, लाज वाटेल.’

‘आणि मला द्यायला?’

‘आनंद वाटेल. तुम्हाला द्यायला कसली आहे भीती?’

‘करा तर मग. मी जातो हे दोन घेऊन.’

‘परंतु तुमचे नाव काय?’

‘माझे नाव चारु.’

‘चारु म्हणजे सुंदर. होय ना?’

‘मला संस्कृत फारसे येत नाही.’

‘तुम्ही कॉलेजात होतात. मला माहीत आहे.’

‘तुम्हाला काय माहीत?’

‘एक दिवस बाबा आईला सांगत होते.’

‘तुम्ही चोरुन ऐकलेत वाटते?’

‘कानांवर आले. कान मिटण्याऐवजी ते अधिकच ताणून ऐकू लागल्ये.’

‘का बरे?’

‘माझ्या लग्नाची कुणकुण घरात चालली आहे मला माहीत होते. आपल्या लग्नासंबंधीचे बोलणे कोणाला ऐकावेसे वाटणार नाही?’

‘कॉलेजात शिकलेला पाहिजे वाटते तुम्हाला नवरा? तुम्ही मामलेदारांच्या कन्या. तुम्हाला चांगला आय. सी. एस. मिळेल की नवरा.’

‘परंतु चारु म्हणजे सुंदर ना?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel