चित्रा व चारु परस्परांस अनुरूप होती. सुखाला वास्तविक तोटा नव्हता; परंतु सासू मनात चरफडत होती. चित्रा नि चारु यांचा बेबनाव व्हावा असे तिला वाटत होते. चारूच्या मनात चित्राबद्दलचे जे अपार प्रेम होते ते नष्ट व्हावे असे तिला वाटत होते. चारूने चित्रा त्याग करावा आणि आपल्या मैत्रिणीच्या मुलीशी त्याचे दुसरे लग्न लावावे असे ती मनात योजीत होती.

चित्रा सुखात वाढलेली होती. फारसे कामकाज करण्याची तिला सवय नव्हती;  परंतु गोडगावाला पिठाची गिरणी नव्हती. घरीच दळावे लागे. मोलकरीण दळीत, परंतु सासू मुद्दाम चित्राला दळायला लावी. चारु शेतावर गेलेला असावा आणि इकडे सासूने दळण द्यावे.

‘लौकर दळ. चारु शेतावरून यायच्या आधी झाले पाहिजे. समजलीस? तुम्ही शहराच्या पोरी; परंतु येथे खेड्यात नाही हो नुसते बसून चालणार. येथे चार धंदे करायला हवेत. चांगले बारीक दळ. परवा पसाभर फक्त डाळ दिली हरभ-याची दळायला, तर नुसता भरडा काढून ठेवलास आणि चारुला हात दाखवलेस वाटतं? जसे फोडच आले असतील हातांना! आम्ही पायली पायली हातांनी दळतो. मोठी नाजूक राणी. कोणा कलेक्टरशी बापाने लावायचे होते लग्न. येथे गांवढ्यात कशाला दिली? तरी मी पहिल्यापासून सांगत होते की, शहरी मुलगी करू नका; परंतु या चारुचा चावटपणा. येतील म्हणावं अनुभव. हा चारुच उद्या म्हणेल की, नको बया. नखरेबाज चढेल मुलगी कोणाला आवडेल? घे की ते दळायला! रडायला काय झाले? ढोंगे येतात करायला.’

सासूचा पट्टा चालला होता. चित्राने जाते घातले. ती दळीत होती. दोन्ही हातांनी दळीत होती. तिला जाते ओढेना. तरी कष्टाने दळीत होती. इतक्यात शेतावरून चारु आला. तो  चित्रा तेथे दळीत आहे. डोळ्यांत पाणी आहे.

‘चित्रा, ये. आपण दोघंजणं मिळून दळू. ये. रडू नकोस आता. हस.’

‘चारु, नको, तू जा. सासूबाई रागावतील. माझी लाज राख. जा.’

‘मी नाही जाणार. मी तुला हात लावणार.’

‘नको रे चारु. माझी फजिती का करायची आहे? गडीमाणसे येतील, मोलकरीण येतील. मला हसतील. म्हणतील, त्यांना दळायला बसवलंन्. जा हो चारु. तुझे माझ्यावर प्रेम आहे, ते दळायला लागून नको हो दाखवायला.

जा, जा.’

‘मी जाणार नाही. घाल दाणे.’

‘हट्टी आहेस तू चारु.’

‘आणि तूही हट्टी आहेस.’

‘बरे ये. दळू दोघं. तू गेलास म्हणजे सासूबाई याचे उट्टे काढतील.’

‘तू आपली नेहमी माझ्याबरोबर राहात जा.’

‘नेहमी कशी तुझ्याबरोबर येऊ? असा काय धरतोस खुंटा?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel