‘चित्रा, भिऊ नकोस. आता काळजी सोड.’

दोघी मैत्रिणी गळ्यात गळा घालून रडल्या. चित्राने सारी हकीगत सांगितली. सासूचे कारस्थान सांगितले. मधूनमधून तिला हुंदके येत. फातमाचे डोळेही भरून येत.

‘फातमा, चारू तडफडत असेल. बाबा दु:खाने वेडे झाले असतील. लवकर मला मुक्त कर.’

‘चित्रा, माझ्या बाबांना मी बोलावून घेते. ते आमदार आहेत. त्यांच्या अनेकांशी ओळखी आहेत. मोठ्यामोठ्यांशी. पुष्कळ हिंदू आमदारही त्यांच्या परिचयाचे आहेत. बाबांना बोलावते. ते दिलावरचे कान उपटतील. तू आता निश्चिंत राहा. आता चल माझ्याबरोबर माझ्या घरी. मोठे आहे घर. एका खोलीत बाबा येईपर्यंत तुला सुरक्षित ठेवीन. चल, बाबा तुला तुझ्या घरी घेऊन जातील हो. उगी, रडू नको. किती दिवसांनी भेटलो आणि किती चमत्कारिक परिस्थितीत. मला लाज वाटते. माझ्या नव-याच्या हातून तू संकटात पडावीस!’

‘परंतु वाचवण्यासाठीच तुझ्या पतीच्या हाती आल्ये म्हणायची. दुस-या कोणाच्या हातात पडल्ये असत्ये, तर फातमा, माझे काय झाले असते? देवाची दया की माझी विक्री होत होती. माझ्या शीलावर कोणी गदा आणली नाही.’

‘चल ऊठ हा बुरखा घे.’

‘त्या तिघीजणी निघाल्या. फातमाचे घर आले. चित्रासाठी झाडून ठेवलेल्या खोलीत फातमा तिला घेऊन गेली.’

‘चित्रा, उद्या मी तुला न्हाऊ घालीन. तुझ्या केसांना सुगंधी तेल लावीन.’

‘फातमा, चारू दृष्टीस पडेपर्यंत नकोत तेले, नकोत उटणी. त्याने जिवाचे बरेवाईट तर नसेल ना केले? मी जणू त्याची प्राण आहे.’

‘चित्रा, भेटतील हो सारी. शांत राहा, मी बाहेरून कुलूप लावीन. दिलावर घरात नसला, म्हणजे मी तुझ्याजवळ येईन. आता रडू नकोस. तुझी ग्रहदशा संपली. आता सुखाचे दिवस
येतील. खरेच, तुझ्या वडिलांचीही चौकशी करवते. बाबांना बोलावते. तारेनेच बोलावते. म्हणजे सारे ठीक होईल हो.’ फातमाने धीर दिला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel