तिने पत्र पाकिटात घालून कोणाजवळ तरी टाकायला दिले. तिसरा प्रहर झाला. देवीला जायची तयारी झाली. खण, नारळ वगैरे सारे घेण्यात आले. चारूची आई व चित्रा निघाल्या.
बरोबर गडी न्या.’ कोणी तरी म्हणाले.

कोणी नको. दोघी जाऊन येतो. भीती थोडीच आहे?’ चारूची आई म्हणाली.

गावातून दोघी बाहेर पडल्या. देवीच्या मंदिराचा रस्ता आता त्यांनी धरला. दुतर्फा झाडी होती. रस्ता चांगला होता. मोटार जाईल रस्ता. इतक्यात हॉर्न वाजला. कोठेतरी मोटार आहे वाटते?

चालल्या दोघी पुढे. देवीचे मंदिर आले. तो जवळ एक मोटार उभी.

चारूची आई व चित्रा, मंदिरात गेल्या; परंतु इतक्यात चारूची आई काय  म्हणाली, ‘चित्रा, ती खाली नदी आहे. तिच्या पाण्याने हातपाय धुवुन ये जा. मग देवीची ओटी भर. जा बेटा.’

चित्राला खरे वाटले. ती मंदिरातून बाहेर पडली. इतक्यात कोणी तरी एकदम तिच्या तोंडावर बुरखा टाकला. तिच्या तोंडात बोळा कोंबला गेला. ती थोडी ओरडली. धडपडली. परंतु त्या दांडग्या लांडग्यांनी त्या हरिणीला घट्ट धरली. तिला मोटारीत टाकून ते पळून गेले.

चारूची आई एकटीच रडत ओरडत घरी आली.

‘काय झाले? चित्रा कोठे आहे?’ सर्वांनी विचारले.

‘गेली हो. कोठे गेली? मी आपली देवळात वाट पाहात आहे. हिचा पत्ता नाही. नदीवर हातपाय धुवायला गेली. बराच वेळ झाला. मी जाऊन पाहात्ये, तो कोणी नाही. तेथे डोह वगैरे नाही. खळखळ वाहणारे गुडघाभर पाणी. कोठे गेली? का कोणाबरोबर पळाली? चारूला मी नेहमी म्हणायची की, ही बया चांगली नाही म्हणून; परंतु तो लक्ष देत नसे. तो तिला सैल सोडी. चांगले चौदावे रत्न दाखवायला हवे होते. कोठे गेली कार्टी? काळिमा फाशील सर्वांच्या तोंडाला. आता चारूला काय सांगू? काय लिहू? जा तुम्ही तरी. बघा, कोठे सापडत्ये का                                                                                                                                       ?’ लोक शोधायला गावभर गेले; परंतु चित्राचा पत्ता नाही.

‘तिने कोणाजवळ काही ठरवलेले असावे.’ एकजण म्हणाला.

‘या गावात बाहेरगावचे पुष्कळ रंगेल तरूण येतात. दिसतात गुलजार. गेली असेल पळून. दिला असेल कोणी विडा!’ आणखी कोणी म्हणाला.

‘आणि आज बुधवारी जायची गरज तरी काय होती? मंगळवार शुक्रवारी गर्दी असते. तिला गर्दी नको होती. एकान्त हवा होता.’ तिसरा बडबडला.

‘मी तिला चांगली सांगत होत्ये की शुक्रवारी जाऊ. तर म्हणे कशी की, गर्दीत प्रार्थना मनापासून नाही करता येत. बुधवारीच जाऊ. अगदी एकटी जाणार होती. म्हणे कशी, कोणी नको बरोबर; परंतु मी म्हटले की कोणी नको तर नको; परंतु मी येईन बरोबर. तिने कोणाजवळ तरी ठरवले असावे.’ चारूची आई म्हणाली.

‘हा शिक्षणाचा परिणाम.’ एक सदगृहस्थ उदगारले.

‘आता चारूला कळवा.’ कोणी सुचवले.

‘काय, कळवा काय? एकाने विचारले.

‘कळवा, चित्रा कोणाचा हात धरून गेली. जाऊ दे दु:खी होऊ नकोस. येथे दुसरी मुलगी तयार आहे, तुझ्या आईची मैत्रिणीची. तुझ्यासाठी जणू. तिचे अद्याप कोठे जमलेले नाही. देऊ बार उडवून, असे लिहा.’ एका शिष्टांनी तपकीर नाकात कोंबीत सांगितले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel