१२

मरणाची आपणा सर्वांना भीती वाटते, परंतु जीवन आणि मरण दोन्ही देवाच्या थोर देणग्या आहेत. दिवस आणि रात्र, दोन्हींत मौज आहे. दिवसा सूर्य दिसतो तर रात्री चंद्र, अगणित तारे यांची शोभा दिसते. अवस आणि पुनव दोन्ही आपण वंदिल्या पाहिजेत. लहान मूल आईच्या दोन्ही स्तनांतून भरपूर दूध पिते. जीवन आणि मरण म्हणजे जगन्मातेचे दोन स्तनच होत. दोन्हींतही आनंद आहे.

महात्माजी मृत्यूसही देवाची दया मानीत. ‘मेलो तरीही देवाची कृपा समजा’, असे ते अनेकदा उपवासाचे वेळेस म्हणायचे. १९१६-१७ मधील गोष्ट. बिहारमधील चंपारण्य भागात महात्माजी शेतक-यांचा लढा चालवीत होते. गोरे मळेवाले सरकारच्या साहाय्याने अपरंपार जुलूम करीत होते. एकदा एक तरुण शेतकरी जवान लाठीमाराने डोके छिन्नभिन्न होऊन बळी पडला. त्याची आई म्हातारी होती. तिचा तो एकुलता एक मुलगा. तिच्या दु:खाला सीमा नव्हती. ती महात्माजींकडे येऊन म्हणाली : ‘एकुलता एक बाळ गेला, अरेरे! तुम्ही त्याला करा ना जिवंत?’ महात्माजी काय करणार? ते गंभीरपणे म्हणाले, ‘आई, तुझा बाळ मी कसा जिवंत करू? माझी कोठे अशी शक्ती, अशी पुण्याई? आणि असं करणं बरंही नाही! मी तुला दुसरा मुलगा देऊ?’ असे म्हणून महात्माजींनी त्या वृद्ध माउलीचे ते कंपित हात आपल्या डोक्यावर ठेवले आणि अश्रू आवरीत त्या मातेला म्हणाले : ‘या, लाठीहल्ल्यात गांधी मेला. तुझा मुलगा जिवंत आहे. तो हा तुझ्यासमोर आहे. तुझा आशीर्वाद मागत आहे.’ त्या अम्माला अश्रू आवरत ना. तिने महात्माजींना जवळ ओढून घेतले. त्यांचे डोके आपल्या कुशीत घेऊन ‘माझा बापू!’ असे ती म्हणाली. तिने त्यांना ‘शताउक्षी व्हा!’ असा प्रेमळ आशीर्वाद दिला.

१३

आपला देश एक मोठा अजबखाना आहे. संस्कृतीच्या सर्व पाय-यांवरचे प्रकार येथे दिसून येत असतात. ज्या गावात ज्ञानस्वरूप परमात्माची उपासना करणारा एखादा संन्यासी असतो, त्याच गावात देवाला कोंबड्या-बक-यांचे बळी देणारेही लोक असतात. आणि गावात मरीआईची साथ आली म्हणजे बक-यांची मिरवणूक काढून त्याला जिवंत पुरतात. असे बकरे पुरून का कॉलरा जातो? स्वच्छता आणि म्हणजे मरीमाय जाईल. अज्ञान, रूढी यांनी आपण ग्रस्त आहोत.

महात्माजी त्या वेळी चंपारण्यात शेतक-यांचा लढा चालवीत होते. एके दिवशी सायंकाळी एक मिरवणूक जात होती, आरडाओरडा होत होती. गांधीजींनी जवळच्या कार्यकर्त्यास विचारले : कसली मिरवणूक? तो कार्यकर्ता बोलेना. बळी द्यायला काढलेल्या बक-याची ती मिरवणूक होती. महात्माजी उठले. ते त्या मिरवणुकीत सामील झाले. माळा घातलेल्या बक-याबरोबर ते चालू लागले.

मिरवणूक देवीच्या मंदिराजवळ आली. महात्माजी त्या बक-याजवळ होते. त्यांनी विचारले:

‘बक-याचा बळी कशासाठी?’

‘देवी प्रसन्न व्हावी म्हणून!’

‘बक-यापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. माणसाचा बळी दिला तर देवी अधिकच प्रसन्न होईल. असा कोणी मनुष्य तयार आहे का पहा. नाही तर मी तयार होतो.’

कोणी बोलेना. सारे मुके होते. महात्माजी म्हणाले : ‘मुक्या प्राण्याच्या रक्ताने का देवी प्रसन्न होते? तशी प्रसन्न होणार आसेल तर स्वत:चं अधिक मौल्यवान असं रक्त द्या, ते का नाही देत? तेव्हा ही फसवणूक आहे. हा अधर्म आहे.

‘तुम्ही आम्हांला धर्म सांगा.’

‘सत्यानं वागा. प्राणिमात्रावर प्रेम करा, सोडा तो बकरा. आज ही जगदंबा तुमच्यावर जितकी प्रसन्न झाली असेल तितकी ती पूर्वी कधीच झाली नसेल.’

सारी मंडळी परतली. भगवान् बुद्धांनी २६०० वर्षांपूर्वी एका यज्ञप्रसंगी जे केले तेच महात्माजींनी १९१६-१७ साली केले. महात्माजी म्हणजे प्रेमाची मूर्ती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel