३६

त्या वेळेस महात्माजी सेवाग्रामला आले होते. ते सकाळी संध्याकाळी फिरायला जात. एकदा एक श्रीमंत मारवाडी गांधीजींची भेट घेऊ इच्छित होता. त्याच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते. मुलाला आणि सुनेला महात्माजींच्या पायांवर डोके ठेवायला लावावे असे त्याच्या मनात होते. बापूजींचे आशीर्वाद वधूवरांस मिळावेत म्हणून त्या पित्याला फार आशा होती.

‘तुम्ही सकाळी या. बापू फिरायला जातात, तेव्हा वाटेत भेटा. घेऊन या मुलाला, सुनेला.’ असे सांगण्यात आले.

‘वाटेत नक्की भेटतील? तुम्ही रागावणार तर नाही ना?’

‘आम्ही रागावलो तरी बापूजी थोडेच रागावणार आहेत? सकाळी भेटा.’

तो श्रद्धावान मारवाडी गेला. सकाळ केव्हा होते याची तो वाट पाहात होता. सारी मंडळी लवकर उठली. वधू-वर, वराचे मायबाप निघाले. महात्माजींच्या फिरायला जायच्या रस्त्यावर वाट पाहत ती सारी मंडळी उभी होती.

पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. सृष्टी प्रसन्न होती आणि तिकडून महात्माजींच्या मुक्त हास्याचा मंगल आवाज आला. आले, महात्माजी आले. भारताचे परब्रह्म चालत येत होते.

‘पाया पडा. महात्माजींच्या पाया पडा.’ मारवाडी बोलला.

वधूवरांनी त्या पवित्र चरणांवर मस्तक ठेवले. महात्माजींनी प्रेमाने त्यांना उठवले. क्षणभर बापू गंभीर होते. का बरे?

त्या वधूच्या मुखावर घुंगट होता. बुरखा होता. ती गुलामगिरी बापूंना कशी सहन होणार? डोळे असून आंधळे होणे! पावित्र्य मोकळेपणातच फुलते. बापूजींनी त्या मुलीच्या मुखावरचा घुंगट दूर केला. ते त्या मुलीच्या सास-यास म्हणाले, ‘मी हा पडदा दूर केला आहे. या मुलीचे मुखमंडल असं नेहमी मोकळं ठेवा. पुन्हा हा घुंगट तोंडावर नको.’

‘आपली आज्ञा. आपल्या आज्ञेविरुद्ध आम्ही नाही. तुमचा आशीर्वाद असो.’ सासरा म्हणाला.

‘जे चांगले आहे त्याला प्रभूचा अशीर्वाद नेहमी असतोच.’

असे म्हणून त्या वधूवरांच्या मस्तकावर मंगल हात ठेवून महात्माजी वेगाने फिरावयास निघून गेले.

भारताला मुक्त करणारा महात्मा भारतातील सर्वांच्या जीवनात खरे स्वातंत्र्य आणू इच्छित होता. किती तरी जणांच्या जीवनात बापूंनी अशी क्रांती केली असेल! जगाला तो सारा इतिहास कोण सांगणार? बापूंसारखा क्रांतिकारक झाला नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel