३१

१९३१ मधील ते दिवस. तीस सालचा महान सत्याग्रह थांबला होता. पंडित मोतीलाल नेहरू नुकतेच निजधामास गेले होते. जवाहरलालजींना धीर देऊन गांधीजी पुन्हा दिल्लीला आले. सा-या राष्ट्राचा बोजा त्यांच्या शिरावर होता. त्यांना दु:ख करीत बसायला वेळ नव्हता.

स्वातंत्र्याचा लढा करून राष्ट्र नवतेजाने तळपत होते. परंतु वाटाघाटी व्हायच्या होत्या. शेवटच्या अटी ठरावयाच्या होत्या. विदेशी मालावर निरोधन करण्याचा हक्क. नैसर्गिक मीठ गोळा करण्याचा वा स्व:पुरते तयार करण्याचा हक्क, इतरही काही प्रश्न यावर व्हाइसरॉय आयर्विन नि गांधीजी यांच्यात बोलणी चालू होती. दुस-याही कृष्णछाया होत्या. सरदार भगतसिंग आणि त्यांचे शूर सहकारी यांना फाशीची शिक्षा सांगण्यात आली होती. त्याही बाबतीत गांधीजी शक्य ते करीत होते. सा-या राष्ट्राचा संसार त्यांना चालवायचा होता.

महात्माजींना त्या वेळेस अठरा अठरा तास काम पडे. एके दिवशी तर बावीस तास काम पडले. व्हाइसरॉयबरोबर रात्री बारा बारा वाजेपर्यंत बोलणी चालत. एके रात्री बारानंतर महात्माजी घरी परत आले. दोन वाजायला आले होते. तो राष्ट्रपिता घरी आल्यावर झोपी गेला का? ते थकलेले शरीर अंथरुणावर पडले का? नाही. घरी आल्यावर चरखा घेऊन ते कातीत बसले. कारण रोजचे कातणे राहिले होते. कातणे म्हणजे त्यांची कर्मपूजा. चरख्याला ते देव म्हणत. कारण चरखा गरिबाला अन्न देतो. चरख्यावरचा धागा त्यांना दरिद्रनारायणाशी जोडी. गरिबांच्या श्रमजीवनाशी जोडी. रात्री दमून आल्यावरही दोन वाजता चरख्यावर कातीत बसणारी बापूंची मूर्ती डोळ्यांसमोर आल्यावर हात जोडले जातात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel