१००

गोलमेज परिषदेला आगबोटीतून महात्माजी जात होते. बोटीतील इंग्रज लोकांची मुले गांधीजींच्या खोलीकडे डोकावून बघायची. पुढे या मुलांची ओळख झाली. गांधीजी त्यांचे कान पकडून पाठीवर थापट्या मारायचे. नंतर म्हणायचे; ‘हा खाऊ पुरे ना आता? आता दुसरा कोणता हवा? खजूर की द्राक्षं!’

‘खजूर नको, द्राक्षं, द्राक्षं.’- मुले म्हणत आणि मुले बश्या भरून द्राक्षे घेऊन जात व रिकाम्या करून पटकन आणीत.

‘आता आज पुरेत.’ – गांधीजी हसून म्हणत नि ती निष्पाप मुले अभिवादन करून जात!

१०१

दांडी प्रयाणाचे ते दिवस. महात्माजी पायी जात होते. जणू रामरायाचे चालणे. सा-या राष्ट्राला स्फूर्ती मिळत होती. राष्ट्राच्या जीवनात राम येत होता.

सायंकाळी एके गावी सभा झाली. प्रार्थना झाली. आता मही नदी ओलांडून पलीकडे जायचे होते. भरतीचे पाणी आलेले असले म्हणजे नाव थेट पलीकडच्या तीरापर्यंत जाई. परंतु भरती पुरी होऊन आता ओहोटीची वेळ होती. पुरी ओहोटी लागायच्या आत पलीकडे जायला हवे होते. नाही तर पाणी कमी होऊन नाव जाती ना. मही नदीच्या चिखलातून महापुरुषाला रात्रीच्या वेळी चालत जावे लागले असते.

नाव तयार झाली. महात्माजी नावेत बसले. गुहाच्या नावेत बसलेले जणू प्रभू रामचंद्र! परंतु गांधीजींबरोबर जाता यावे म्हणून नावेत किती माणसे चढली! नाही कोणाला म्हणायचे! नाव भराभरा नेणे प्राप्त होते. ओहोटी लागली होती. झपाट्याने पाणी कमी होत होते. जड नाव वल्हवून नेणे जड जात होते. अखेर रुतली. पाणी फारच कमी. राष्ट्रपुरुष हातात काठी घेऊन खाली उतरला! एकेक पाऊल कष्टाने टाकावे लागत होते. मही नदीत अपार चिखल असतो. कोठे कोठे गुडघ्याहून अधिक चिखल होता. परंतु न थकता, न त्रासता खंबीरपणे महात्माजी जात होते. त्यांना अंतर चालून जायला एका तासाहून अधिक वेळ लागला.

गांधीजी पलीकडे पोचले असतील नसतील, तो या तीरावर पंडित जवाहरलालांची मोटार येऊन थडकली. ते या वेळेस राष्ट्राध्यक्ष होते. महात्माजींना भेटायला आले होते. गांधीजी तर पलीकडे गेले. ओहोटी पुरी झालेली. नाव चालणे अशक्य.

‘पंडितजी, काय करायचं?’ कोणी विचारले.

‘मी पायी जातो.’ ते म्हणाले.

‘खूप चिखल आहे, दमून जाल.’

‘ते वृद्ध असून गेले! मी तर तरुण आहे.’

जवाहरलालांनी कपडे वर केले आणि चिखलातून राष्ट्रपित्याला भेटायला निघाले. पित्याला शोभेसा हा वारसदार पुत्र होता. जाताना नेहरू म्हणाले; ‘मी भेटून लगेच परत येईन.’ परंतु त्या अनंत चिखलातून जाता जाता नेहरू थकले. गांधीजींना जाऊन ते भेटले. परंतु परत जाण्याचे धाडस नेहरूंनी त्याच रात्री केले नाही. नेहरू जेथे थकले तेथे राष्ट्रपिता न थकता गेला. कोठून आली ही शक्ती? इच्छाशक्ती, कृतसंकल्पाची?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel