११२

थोरामोठ्यांपासून मी नेहमी दूर असतो. सूर्यापासून दूर राहून ऊब घ्यावी व आपल्या जीवनाचा विकास व्हावा म्हणून धडपडावे ही माझी वृत्ती. नाशिकच्या तुरुंगात असताना श्री. प्यारेलालजी मला म्हणाले; ‘तुम्ही सुटल्यावर गांधीजींना भेटा. जमनालालजी भेट करवतील.’ मी म्हणालो;

‘मी नाही जाणार. माझं रडगाणं घेऊन कुठंही जायची मला इच्छा नाही.’ मी सुटून अमळनेरला आलो. जमनालालजींचे पत्र आले; ‘तुम्ही या. महात्माजींच्याजवळ तुमची भेट ठरवितो.’ मी लिहिले; ‘क्षमस्व. मी येऊ शकणार नाही.’ पुढे काही दिवस एका खेडेगावात मी राहत होतो. महात्माजी अमळनेरहून वर्ध्याकडे जायचे होते. आम्ही स्टेशनवर त्यांच्यासाठी व त्यांच्या बरोबरच्या मंडळींसाठी खाद्यपेयपदार्थ घेऊन गेलो. गाडी सुटायची वेळ झाली. कोणी तरी मला गाडीत लोटले. दोन स्टेशने स्वयंसेवक बरोबर जाणार होते. गांधी व त्यांच्याबरोबरची मंडळी गाडीत फराळ करणार होती. मग ती भांडी घेऊन स्वयंसेवक परतणा-या गाडीने येणार होते. मी जाणार नव्हतो. परंतु वर लोटला तर गेलो.

‘तुम्हांला दोन मिनिटं देण्यात आली आहेत. गांधीजींकडे जा.’ मला सांगण्यात आले. मी नम्रपणे गांधीजींच्यासमोर जाऊन बसलो. प्रणाम केला. त्यांच्यासाठी आम्ही आंब्याचा रस दिला होता. तो घेऊन ते ते भांडे विसळायला निघाले. मी पुढे होऊन म्हटले; ‘मी विसळतो.’ खुणेने ते नको म्हणाले. हात, तोंड पुसून महात्माजी बसले. मला काही विचारायचे नव्हते. मला कसली शंका नव्हती. शेवटी मी मोठ्या कष्टाने म्हणालो; ‘मी एका खेडेगावात राहतो. परंतु मला समाधान नाही. लोकांना माझी प्रवचनं नको आहेत. मी त्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारणार?’

‘गावात स्वच्छता करीत जा.’

‘ती आम्ही करतो.’

‘ठीक तर. लोकांचं आरोग्य सुधारेल. म्हणजे ते अधिक दिवस काम करतील. त्यामुळं आर्थिक स्थिती थोडी सुधारेल. औषधात पैसे जाणार नाहीत. घरच्या माणसांचा वेळ जाणार नाही. निराश होऊन चालणार नाही. सेवकाला श्रद्धा हवी. दहा वर्षांत आपल्याला एक समानधर्मी माणूस मिळाला तरी पुष्कळ, असं वाटलं पाहिजे.’

दोन मिनिटे संपली. मी प्रणाम करून पटकन निघून गेलो. ‘श्रद्धावान होना’ हे त्यांचे शब्द आजही कानांत घुमत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel