''वैनी, नको उगीच बोलूं. माझ्या भावाची मी बहीण आहें. एका आईच्या पोटांतून आम्ही आलों. आमचा का एकमेकांवर हक्क नाहीं ? रंगाला का मी बोलत नाहीं ? त्या दिवशीं नांही का त्याला मारलें ? कोण आहे त्याला दुसरें ? सारींचजणें जर त्याला खाऊं की चावूं करतील तर त्या पोरानें जावें तरी कोठें ? आणि त्याचा तो मित्र, तो लहान मुलगा आज उपाशी होता. आपण भिकार्‍यालाहि चतकोर नितकोर देतों. मी त्या मुलाला खायला दिलें परन्तु रंगाला नाहीं हो खा म्हटलें. आज रात्रीं मी जेवणार नाहीं. म्हणजे झालें ना ? बेरीजवजाबाकी होईल ना मग बरोबर ? मी दादाला मागेंच म्हटलें की मी आपली एकदांच जेवत जाईन म्हणून. परंतु तो नको म्हणला. आम्ही दोन निराधार जीव. आमच्यावर आकाश कोसळलें. कोठें जाणार आम्ही वैनी ?''

''जायचें होतें मस्णांत. म्हणे कोठें जाऊं आम्ही. रहा कोणाकडे भाकर्‍या बडवायला.''

''तुमच्याकडे करतेंच आहे ना सारें ? वैनी, वेडेंवाकडें नको बोलूं.''

''बोलणार. कोण करणार आहे माझें तोंड बंद ? वेडेंवाकडें काय मी म्हटलें ? म्हणे बोलूं नको. तूं कोण मोठी आलीस ?'' रंगाची आई गप्प बसली. शब्दानें शब्द वाढतो. वाड्यांतील बायका अंगणांत जमल्या. दुसर्‍यांची फजीती पाहण्यांत माणसाला एक आनंद वाटत असतो. दुसर्‍यांचे उणें पाहण्यांत एक प्रकारचें सुख असतें.

शाळा सुटल्या. मुलें घरी आलीं. मामाचीं मुलें घरीं आली. रंगा आला. काशींने सर्वांना खायला दिलें.

''रंगा, पुन्हां त्या पंढरीला घरीं नको आणूं. नुसता आण. परंतु खायला नको आणूं'' आई म्हणाली.

''मला नकोच ही पोळी खायला. माझी आजची पोळी पंढरीला दिलीस असें समज. त्याला आणीन त्या दिवशीं मी कमी खाईन. चालेल आई ?''

आईचे डोळे भरुन आले. मुलें खाऊन खेळायला गेलीं. असे दिवस जात होते.

रंगाला जुन्या बाजारांत हिंडण्याचा नाद लागला. तेथें जुने अंक विकायला असत. पुस्तकें असत. सचित्र सुंदर मासिकें असत. रंगा ती मासिकें चाळित बसायचा. त्यांतील चित्रें बघायचा.

''हें चित्र मला देतां ? मला फार आवडलें आहे'' एखादेवेळेस तो विचारी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel