''हें बघ, आपण कितीहि प्रेम दिलें तरी आईच्या प्रेमाची का सर येणार आहे ? आईनें नुसतें बघणें, त्यांत सारें त्रिभुवन असतें,  रंगाला आपण इकडे आणलं हें त्याच्या आईला सहन झालें नसावें. तो वियोग त्या माउलीला फार जाणवला असावा. नका नेऊं रंगाला असें तरी काशीताई कसें म्हणणार ? मीच त्याला इकडे नको होतें आणायला. तिकडेच त्याला पैसे पाठवले असते तर तो आईला मधून मधून भेटता. काशीताईंच्या अंतरात्म्याला आनंद मिळत राहिला असता. परंतु त्यांच्या सकल सुखाचा ठेवा, त्यांचे परम निधान आपण लांबविलें. रंगा रंगा त्या रोज मनांत म्हणत असतील. मेंदू त्यांचा शेवटीं दुभंगला, शतभंग झाला. हृदय भंगलें. मुलाचें रात्रंदिवस स्मरण करीत त्या देवाघरीं गेल्या. राहून राहून माझ्या मनांत हे असे विचार येतात नि आपण मोठें पाप केलें, मायलेंकरांच्या कायमच्या ताटातुटीला आपण कारणीभूत झालों असें वाटून डोळे शेवटीं भरुन येतात.''

''तुम्ही असें कांही मनांत आणूं नका. रंगाचें आपण सारें चांगलें करुं याची काशीताईंना खात्री होती. त्या दिवाळीच्या सुटींत नयनाकडे गेल्या. मुलांची इतकी आर्त ओढ रात्रंदिवस असती तर त्या इकडे नसत्या का धावत आल्या? त्यांना माहीत होतें कीं रंगा सुखांत आहे. त्या निश्चिंत होत्या. उगीचच मनाला लावून घेतां.''

इतक्यांत रंगाच आंत आला.
''ये रंगा. बैस. कोठें गेला होतास ?''

''वाचनालयांत गेलों होतों. काका, आज मला बरें नाहीं वाटत. कांही तरी होतं आहे.''
''काय होतं ? तापबीप नाहीं ना आला ? सर्वत्र साथ आहे. बघूं ?''

वासुकाकांनी त्याच्या अंगाला हात लावून पाहिलें. कढत होतें अंग. ते चपापले. रंगाचे डोळेहि जरा लाल दिसत होते. चेहरा तप्त दिसत होता.

''रंगा, बाळ तुला ताप आला आहे. चल नींज. आंथरुणावर पडून रहा. थंडी वाजली का ?''

''दोन दिवस मला कणकण वाटे. परंतु म्हटलं थांबेल. आज मात्र हातपाय गळून गेल्यासारखें वाटतें. वाचनालयांत मी बसूं शकलों नाहीं.''

सुनंदानें नीट आंथरुण केलें. रंगा जाऊन झोंपला. मच्छरदाणी लावण्यांत आली. वासुकाकांनी तापनळी लावून ताप पाहिला.

''किती आहे काका ?''
''आहे, बराच आहे. पडून रहा हं बाळ''
''पण किती आहे सांगा ना ? मी कांही घाबरत नाहीं. तुम्ही नि काकू जवळ असल्यावर मी कशाला घाबरुं ? किती आहे ताप ?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel