''त्यांचें ध्येय वाढवून. मी एकटी नाहीं बाबा. ते माझ्याजवळ आहेत. मला समोर दिसतात. मी चित्र काढायला बसलें तर कोणी तरी माझीं बोटें धरित आहे, कोणी बोटांत शिरत आहे असें वाटतें. मी एकटी नाहीं. आणि त्यानीं भारतचित्रकलाधाम संस्था माझ्या स्वाधीन केली आहे. तेंच आमचें चिमुकलें बाळ. तें मी वाढवीन. तुम्ही मुलीला आशीर्वाद द्या. बाबा, तुमचें किती प्रेम ! मी तुम्हांला सोडून गेलें. परंतु मी कृतघ्न नव्हतें. मुलींचे जीवन दुसर्‍यासाठी असतें. मला जो आवडला, माझ्या जीवनांत जो भरलेला होता, त्याला मी तें अर्पण केलें. रंगाच्या आईजवळ मी एकदां म्हटलें होतें 'आई, मी तुमच्या रंगाजवळ लग्न लावीन.'  त्या हंसल्या व म्हणाल्या 'रंगा गरीब, तूं श्रीमंत' परंतु त्यांचे हंसूं गेलें नि डोळ्यांत आंसवें आली. मरतांना मला म्हणाल्या 'रंगाला सुखी कर.'  त्यांच्या त्या शब्दांत का अधिक अर्थ होता ? रंगाची आई माझ्या खाटेवर होती. मीच शुश्रूषा केगली. जणूं मी त्यांची लहानशी सून झाले होतें. बाबा, अशा रीतीनें रंगा माझ्या जीवनांत शतधाग्यांनीं गुंफिला गेला, विणला गेला, भरला गेला. तो अल्पायुषी ठरला. प्रभूची इच्छा. तुम्ही मजवर रागावूं नका. माझें चुकलें असलें तर क्षमा करा. एकदां ज्याला मन दिलें त्यालाच नको वरुं तर कोणाला ? असो. मी शान्त असेन. कर्तव्य करित राहीन. तुम्हां सर्वांना स्मरेन, अश्रूंची तिलांजलि देत जाईन.''  ती असें म्हणून उठली. पित्याच्या थंडगार चरणांना तिनें कढत अश्रूंनीं भिजविलें. तो वृध्द गहिंवरला. उठूं लागला.

''उठूं नका बाबा, पडून रहा.''
''नयना'' एवढेंच तो म्हणाला नि पुन्हां पडला. तिनें पित्याला मांडी दिली.
''नयना, तुझ्या ध्येयबाळासाठीं सारी इष्टेट मी करुन ठेवली आहे. हे सारें मीच कमावलेलें. तुझ्या संस्थेला सारें दिलें आहे. वाटलें तर या वाड्यांतच संस्था आणा. येथें आपला सुंदर चित्रसंग्रह आहे. सातारा महाराष्ट्राचें हृदय. शौर्य नि वैराग्य यांचे आजुबाजूचें वातावरण. जवळ माहुली. संगम. तुला वाटलें तर इकडे संस्था आणा. नाहीं तर हा वाडा विकून टाका. योग्य तें करा. रंगाला मी वांचवूं शकलों नाहीं. परंतु त्याचें ध्येयबाळ मरुं नये म्हणून मी शक्य तें सारें केलें आहे. त्या ध्येयबाळाला वाढव. सुखी समाधानी रहा. तुझें जीवन ध्येयपूजेनें कृतार्थ होवो. पित्याचें प्रेम, पित्याचे आशीर्वाद मागावे नाहीं लागत. ते सदैव मिळतच असतात बाळ. ये, जवळ ये.''

तिनें डोकें खाली केलें. त्यानें आपले वरदहस्त, ते वत्सल हात तिच्या डोक्यावर ठेवले.

''कृतार्थ हो'' तो म्हणाला.
खोलींत आणखी मित्रमंडळी आली. आजीबाई मधून येई. परंतु अत:पर सारें शान्त होतें. वडील देवाकडे गेले. शान्तपणें त्यानीं देह सोडला. आत्मा परमात्म्यांत मिळाला. नयनानें सुनंदाआईंना, मणीला सविस्तर पत्रें लिहिलीं. ती त्या वाड्यांत एकटी फिरे. लहानपणच्या आठवणी. आईच्या, वडिलांच्या तैलचित्रांसमोर उभी राही नि रडे. तिला एकाकी वाटे. सारे बंध तुटले. असें कसें माझें जीवन ? परंतु बंध आहेत. सुनंदा आहे, ताई आहे, मणि आहे, आणि तो पंढरी ? तो असेल का जिवंत ? का जपान्यांच्या ताब्यांत गेला, मारला गेला ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel