नयना दु:ख विसरली. पुढील योजना करुं लागली. परंतु ताई म्हणाली ''रंगाला हें गांव आवडे. येथें नदीतीरी अपूर्व शोभा. पलीकडे तो नेहमीं हिरवागार असणारा डोंगर. तो धबधबा ! तें रामरायाचें मंदीर. रंगाचीं तेथील अव्दितीय चित्रें ! आपण येथील नदीतटाकीं भारतकलाधाम बांधूं. तें मंदीर आपल्या संस्थेच्या आवारांत आणतां आलें तर पाहूं. आपणच मंदिराचीं पुजारी होऊं. हल्लीं तेथें व्यवस्थाहि नीट नसते. संस्था व्यवस्था ठेवील. नयनाताई, तो सातारचा वाडा विका. वाईट नका वाटून घेऊं. शेवटीं ध्येयासाठी जगायचें ना ? तुमच्या वडिलांचा तो कलावस्तूंचा संग्रह येथें आणूं. आपण नवीन भव्य संस्था उभारुं.''

''ताई, वाडा विकून कितीसे पैसे येतील ?''
''आपण कांही दिवस थांबूं. युध्द संपूं दे. पंढरी येऊं दे.''
''पंढरी कोठें आहे ?''
''माझ्या स्वप्नांत. मी येतों म्हणाला.''
''आई, तुमचें काय मत ?''
''मला ताईचें म्हणणें भावना नि विचार दोन्ही दृष्टीनें योग्य वाटतें. मला आशा आहे. युध्द संपल्यावर जागतिक प्रदर्शन भरेल. रंगाचीं चित्रें तेथें पाठवूं. मला वेडी आशा वाटते कीं तीं चित्रें भारताचें नांव करतील.''

''कदाचित् भारतमाता तुमच्या तोंडानें बोलत असेल'' नयना म्हणाली. दुधगांवलाच रंगाचें स्मारक, ती भारतचित्रकलाधाम संस्था सुरु करायचें ठरलें. नयना रंगाच्या भारतदर्शनांतील उरलेली चित्रें काढित बसे.

तिकडे आजीबाई होती. नयना एकदां गेली व तिला घेऊन आली. वाड्याची देखरेख भय्या करी. एका खोलीत तो राही. बागेला पाणी घाली. वाडा विकण्याचा विचार वडिलांच्या मित्रांच्या कानांवार घालून नयना आली होती.

हिंदी स्वातंत्र्याचा लढा मंदावला होता. परंतु तिकडे आझाद सेनेचा रोमांचकारी लढा सुरु झाला. नेताजी सुभाषबाबू यांनी शून्यांतून विश्व निर्माण केलें. कैद केलेल्या हिंदी शिपायांना मुक्त करुन त्यांची मुक्तिसेना त्यानीं उभी केली. स्वतंत्र सरकारची घोषणा केली. स्वतंत्र नाणें पाडलें. अंदमान निकोबार बेटांना शहीद बेटें नांवे दिलीं. हिंदु मुसल्मान शीख सारे एकत्र आणले. त्यांना चलगानें दिलीं. जयहिंद मंत्र दिला. चलो दिल्ली ध्येय दिलें. हिंदु मुसलमान व्यापार्‍यांनीं लाखों काय, कोटि कोटि खजिने दिले. फुलांचे हार, नेताजींच्या स्पर्शानें दिव्य झालेले, लाखों रुपयांना जात. लहान मुली बंदुका घेऊन चालूं लागल्या. मरणाचा डर गेला. रंगूनला नेताजी आले. रंगून मुक्त झालें. शेवटच्या मोंगल बादशहाच्या कबरेचें नेताजीनीं दर्शन घेतलें. हिंदुमुस्लीम ऐक्याची ते मूर्ति बनले. ते जेव्हां बोलत तेव्हां नवीन पैगंबरच बोलत आहे असें मुस्लीम तरुणांस वाटे. ती दिव्य दैवी प्रभा होती. भारतांच्या मुक्तिध्यासाचें तें तेजोवलय होतें. नेताजी म्हणजे विवेकानंद, चित्तरंजन, खुदीराम-सर्वांची जणुं मूर्ति !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel