''नका मारुं तिला, मला मारा.''
''दोघांना मारतों.''
तिकडून रंगा धावून आला. त्यानें लिलीला उचललें.
''ठेवा खालीं तिला.''
''तुम्ही का पशु आहांत ? त्या मुलीला किती मारलेंत ?''

''पशु तुम्ही, दुसर्‍याच्या सुखांत विष कालवणारे. साप तुम्ही साप. खोलींतून बाहेर निघा. माझ्या मुलीचें मी वाटेल तें करीन.''  त्यानें लिलीला ओढून घेतलें. ती भाऊभाऊ म्हणून ओरडूं लागली. ''पुन्हां भाऊ म्हणशील तर बघ, डाग देईन तोंडाला'' त्या खवळलेल्या पित्यानें त्या लहान मुलीला बजावलें. फुलांवर निखारे ओतावे त्याप्रमाणें तो बोलत होता. रंगा खोलींत गेला. त्याला या अनुभवांची कल्पनाहि नव्हती. तो स्वप्नसृष्टींत रमणारा. संसारांतील या कुरुपतेकडे त्याचें लक्ष कधीं गेलें नव्हतें. आज त्याला आपला सारा आनंद अस्तास गेल्याप्रमाणें वाटलें. निरागसता, निष्पापता म्हणून जगांत नाहींच का ? जगांत संशय, सूड, दुष्टावा, अहंकार यांचेच का सर्वत्र राज्य ?

रात्रीं त्याला झोप आली नाही. त्याची ताईहि तळमळत होती. लिली झोपेंत भाऊ भाऊ म्हणत होती.

सकाळ झाली. अमृतराव बाहेर पडले. आणि ते कोठेंतरी नवीन जागा ठरवून आले.

''आजच बिर्‍हाड मोडायचें. येथें आज स्वयंपाक नाहीं करायचा. बांधाबांध कर. आंवराआंवर कर. बघतेस काय ?''

आंवराआंवर सुरु झाली. रंगानें लिलीला दिलेंली चित्रें, ती सारीं टरकवण्यांत आलीं. लिली रडत होती. भाऊनें दिलेलें चित्र ती म्हणे. तिला थप्पड मिळे. रंगा शून्य मनानें बसला होता.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel