‘आई, स्वप्नच अधिक सुंदर असते. कल्पनाच अधिक गोड असते. हे चित्र नेहमी असेच दिसेल. ते कधी रुसणार नाही, रागावणार नाही. प्रत्यक्ष सजीव मूर्ती सदैव का अशीच दिसेल?  तिचे रंग क्षणोक्षणी बदलतात.’ ‘बाळ म्हणूनच त्यात अधिक गोडी. हे चित्र आहे तसेच राहील. ते रागावणार नाही, ते बोलणार नाही. त्यात काय मजा? मनुष्याला रागावणे, रुसणे आवडते. लहानपणी तू रागवावे, तुझे गाल फुगावे असे मला कधी कधी वाटे. तुणे कधी मुके घेत असे तर तुला लबाडा असे म्हणून गंमतीने चिमटेही काढीत असे. तुला खोटे नाटे रागे भरत असे. हरणारा माझा राजा मग ओक्साबोक्शी रडू लागे. मग त्याला एकदम पोटाशी घट्ट धरुन उगी करण्यात मला किती धन्यता वाटे. बुधा, वेडा आहेस तू. चित्र क्षणभर रमवील. कायमचे नाही हो रमवणार. हे चित्र डोळयांना आनंदवील, परंतु कानांना, दातांना, सर्वेंद्रियांना थोडाच आनंद देणार आहे? बुधा, खोलीत बसून मुलीचे चित्र नको काढीत बसू. आता तुझे लग्न करायला हवे. तू हूं म्हण. कितीतरी मुली सांगून येत आहेत. सोन्यासारख्या मुली.’

‘आई कोणती मुलगी आणणार तुम्ही?’
‘चांगली असेल ती. कुलवंताची, धनवंताची.’
‘आई, मला मधुरी आवडते. माझी लहानपणीची मैत्रीण.’

‘लहानपणीची मैत्रीण लहानपणी गोड. मधुरी एका गरिबाची मुलगी. तिच्याशी का लग्न लावावयाचे? सारे जग हसेल. जे नीट शोभेल, साजून दिसेल, तेच केले पाहिजे. रत्नाला सोन्याचे कोंदण शोभते.

‘आई, मी एकदाच कायमचे सांगून टाकतो. मधुरीशिवाय दुसरी मुलगी मला नको. मला मधुरी मिळाली नाही तरी तिची शेकडो चित्रे मी काढीत बसेन. मधुरी असे तिचं नाव जपत बसेन. ते नाव पाटीवर लिहीन, कागदावर लिहीन. माझे सारे जग म्हणजे मधुरी. हसणारी मधुरी मी रंगवीन. रडणारी मधुरी मी रंगवीन, समुद्राच्या लाटांशी खेळणारी, टेकडीवर बसलेली, फुलांनी नटलेली, शेकडो स्वरुपांत दिसणारी मधुरी मी काढीन. प्रत्यक्ष मधुरी न मिळाली तर काल्पनिक मधुरीशी मी लग्न लावीन.’

‘बुधा, हा हट्ट सोड. तुझ्या तो आवडणार नाही.’
‘तुला आवडेल का?’
‘मलाही आवडणार नाही. तू आमचा एकुलता एक मुलगा, आम्हाला दु:खी करु नकोस.’
‘आई, मी घरातून निघून जाऊ?’

‘नको हो, असे मनातही आणू नकोस. काही कर, परंतु आम्हांला सोडून नको जाऊस.’
आईने पित्याला ती गोष्ट सांगितली. मधुरी-मजुराची मुलगी मधुरी? पिता रागावला, संतापला. दुस-या एका घरची फारच सुंदर मुलगी सांगून आली होती. पाच हजार रुपये हुंडा देणार होते. एके दिवशी पिता बुधाची समजूत घालीत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel