असा कधी कधी समुद्राचा गंभीर व भीषण संदेश मंगाला ऐकू येई, तर कधी प्रेमाच्या गोष्टी ऐकून गुदगुल्या होत. ये, मंगा ये. घे एक लहान होडी व ये माझ्याजवळ. माझ्या लाटावर नाचवीत मी तुला जगभर घेऊन जाईन. मंगा, ये. मंगा, तू व्यापारी हो. भर गलबतात माल. नीघ. मी देशोदेशीचे लोक तुला दाखवीन. ही बहुरत्ना वसुंधरा तुला दाखवीन. तुझी दृष्टी कृतार्थ होईल. जगात किती विविधता आहे हे तुला कळेल! शेकडो प्रकारची हवा, शेकडो प्रकारची फुलेफळे, पशुपक्षी; नाना रंगाचे, नाना धर्माचे, नाना स्वभावाचे लोक, चल तुला दाखवतो. तू व्यापार कर. श्रीमंत हो. ये मंगा, असा गरिबीत खितपत नको पडू. ज्याचा दर्या, त्याची लक्ष्मी. मी लक्ष्मीला जन्म देणारा. मी तुला श्रीमंत करीन. परंतु हिंडाफिरायला ये. आपले डबके सोड. विशाल दृष्टी घे, अफाट जगात चल. व्याप वाढला की वैभव वाढते. का उगीच रडत बसतोस! कपाळाला हात लावतोस! शिडात वारा भरला म्हणजे नावा झरझर जातात. तू आपल्या भावनांत आशेचा वारा भर व सोड तुझी नाव माझ्यावर, ये बाळ ये.

मंगाला समुद्राची ही गोड हाक अलीकडे ओढू लागली होती. दिपवाळीच्या त्या दिवशीच्या प्रसंगापासून तो दारिद्रयावर संतापला होता. दारिद्रयापेक्षा मरण बरे असे त्याला वाटू लागले होते. या जगातील सर्वांत पापमय गोष्ट कोणती असेल तर ते दारिद्र्य. ज्याला जगाची सुधारणा करावयाची असेल, मानवी मनाचा विकास करावयाचा असेल, त्याने आधी हे दारिद्र्य दूर करावे, जगाची खाण्यापिण्याची ही साधी ददात आधी दूर करावी.

मंगा बंदरावर काम करायला जाई; परंतु त्या कामात आता त्याचे मन रमत नसे. तो माल उतरू लागे. कधी कधी त्या मालाकडे पाहात राही. शेवटी त्याला मक्तेदारी किंवा मालक रागे भरत, तेव्हा तो पुन्हा माल उतरू लागे. आपणही काही असा माल घेऊन गेलो तर! येथला माल दूरच्या देशात विकू. तिकडचा इकडे आणू, असे त्याच्या मनात येई. तो कधी कधी गलबतांवरच्या खलाशांजवळ बोलत बसे. सायंकाळ व्हावी. घरी येण्याची वेळ झाली असावी. परंतु मंगा गलबतावरच असे. माहिती मिळविण्यात दंग असे. अनेक लोकांच्या, अनेक देशांच्या गोष्टी ऐके. कोण कसे श्रीमंत आहेत, श्रीमंत कसे झाले, त्यांच्या हकीकती ऐके.

एके दिवशी मंगा असाच रमला होता. घरी मधुरी पाहून दमली. अलीकडे मंगा वेळच्या वेळी घरी येत नसे, म्हणून तिला वाईट वाटे. परंतु आज कमालच झाली. शेवटी सोन्या व रुपल्या यांना घरी राहा असे सांगून, भांडू नका असे सांगून, धाकटया मनीला घेऊन मधुरी बंदरावर आली. रात्र झाली होती. होडया, पडाव वगैरे पडले होते तिकडे ती गेली.

‘मंगा, अरे मंगा!’ ती हाका मारीत होती.
शेवटी मंगाने ती हाक ऐकली. आलो, आलो. म्हणून त्याने उत्तर दिले. मंगा आला. मधुरी मनीला कडेवर घेऊन तेथे उभी होती. ती काही बोलली नाही.

‘मधुरी, तू अंधारातून कशाला आलीस?’
‘प्रकाश मिळवायला आल्ये.’
‘मी येणारच होतो. कोठे का जाणार होतो?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel