‘आता जरा पडून राहा. बोलू नकोस. तू थकतेस.’
‘मंगा, तुला गाणे नाही येत? म्हण रे एखादे. खलाशाचे गाणे म्हण. येत असेल तुला.’
‘नाही हो मला गाणे येत. मंगा रसिक नाही.’
‘म्हण काही वेडेवाकडे. मनात जमवून म्हण माझ्या मंगाचे गाणे.’

‘आणि मंगा खरेच गुणगुणू लागला. गाणे म्हणू लागला, नको हे जग चल, समुद्रात जाऊ. अशा अर्थाचे ते गाणे होते. थोडया वेळाने तो थांबला.

‘तू रचलेस हे गाणे?’ मधुरीने विचारले.
‘मला नाही नीट रचता येत. कसे तरी शब्द जुळविले.’
‘परंतु कशा तरी जुळविलेल्या शब्दांतूनही हृदय डोकावते. समुद्रात बुडून जाण्याची तुझी इच्छा त्यातही आहेच. मंगा, काढून टाक ते मनातील खूळ. नाही ना असे मनात आणणार पुन्हा?’  
‘नाही.’
‘माझ्या बाळाची शपथ घे.’

दोघे घरी गेली. असे दिवस जात होते. मधुरीचे दिवस भरत येत होते. म्हातारीनं तयारी केली होती. वारा लागू नये अशी व्यवस्था तिने केली होती. खाट तिने करवून घेतली. दोन नवी कांबळी विकत घेतली. खाण्यापिण्याचे काही करुन ठेवले आणि एके दिवशी मधुरीचे पोट दुखू लागले. मंगाने गाडीत घालून तिला म्हातारबाईकडे नेले. म्हातारीने स्वागत केले. प्रसववेदना सुरु झाल्या. मंगा फे-या घालीत होता. क्षणात आत जाई. कावराबावरा होऊन पुन्हा मागे जाई. त्याला वाईट वाटत होते. नवीन बाळाचा जन्म झाला. नवीन बाळाचे कोवळे केविलवाणे रडणे. अगतिक निराधार जीव. कसे होईल या जगात माझे, असे का मनात येऊन मूल रडत जन्माला येते?

‘मुलगा झाला. मंगा, सारे ठीक आहे.’
‘मी येऊ पाहायला?’
‘थांब जरा.’

थोडया वेळाने मंगा आत आला. त्याने बाळ पाहिले. तो पुन्हा बाहेर गेला. बाळबाळंतिणीचे सारे ठीक झाले. तो दिवस गेला. दुस-या दिवशी मंगा मधुरीजवळ बसला होता. मधुरी थकलेली होती. लहान बाळ झोपले होते. झोपूनच ते वाढते. मधुरीच्या केसांवर मंगा हात फिरवीत होता.

‘थकलीस हो तू.’
‘आता दोन दिवसांत थकवा जाईल.’
‘लौकर चांगली हो.’
‘होय हो राजा.’
आजीबाई सारे करी. मुलाला न्हाऊ घाली. मधुरीच्या अंगाला लावी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel