‘आणि त्याने मागणी नाकारली तर’
‘तुम्ही मधुरीला विचारा.’
‘आणि तिनेही नकार दिला तर?’
‘तर माझी चित्रकला आहे. हे रंग आहेत. हे कुंचले आहेत. माझी मधुरी मी निर्मीन.’

पिता निघून गेला. मुलाला समजाविण्यासाठी आला होता. परंतु मुलानेच समजावून देऊन परत पाठविले. बुधा आपल्या खोलीत विचार करीत बसला. पिता आपल्या खोलीत विचार करीत बसला. शेवटी मधुरीच्या घरी जाऊन मागणी घालण्याचे बुधाच्या बापाने ठरविले आणि एके दिवशी त्याप्रमाणे तो खरोखरच गेला.

काय असेल ते असो, मधुरीचा बाप आज घरी होता. मधुरी जरा आजारी होती. ती पित्याची फारशी लाडकी नव्हती, तरीही तिच्या आग्रहामुळे आज तो कोठे कामधाम करावयास गेला नाही. बुधाचा बाप दिसताच तो एकदम उठला. त्याने स्वागत केले. नीट बैठक घातली. बुधाचा बाप बसला व जवळ थोडया अंतरावर मधुरीचा बाप बसला. बोलणे सुरु झाले.

‘आज घरी होतेत बरे झाले.’ बुधाचा बाप म्हणाला.
‘मधुरीला आज गोड वाटत नाही. जरा आजारी आहे. कामाला आज जाऊ नका म्हणाली. मुलीची जात; राहिलो.’ तो म्हणाला.
‘तुमची मुलगी काही आता लहान नाही.

‘तशी लहान नाही. परंतु आईबापांना लहानच. केव्हाच तिचे लग्न व्हायचे, परंतु अद्याप राहिले.’
‘यंदा करायचे आहे का?’
‘पाहू जमेल तसे. तिच्या कलानेच मी घेणार आहे.’

‘मुलांचा कल वेडावाकडाही असतो.’
‘आपण मोठी माणसे करतो ते तरी सारे कोठे शहाणपणाचे ठरते?’
‘माझा बुधाही लग्नाचा झाला आहे.’

‘तुम्ही मनात आणावयावा अवकाश. श्रीमंतांना काळजी नसते.’
‘काळजी सर्वांना आहे. जगात असा कोणीही नाही की ज्याला काळजी नाही. श्रीमंतांना त्यांच्यापरी काळज्या असतातच.’
‘श्रीमंतांच्या श्रीमंती काळज्या.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel