‘बुधा, नाही म्हणू नकोस. थोरामोठयांचे घराणे, नक्षत्रासारखी मुलगी, पाच हजार रुपये हुंडा. जावयाचे किती कौतुक करतील. ऐक माझे.’

‘नाही बाबा. या एका गोष्टीत मी कोणाचे ऐकणार नाही. मधरी, मधुरीशिवाय मला कोणी नको. लहानपणापसून माझ्या जीवनात ती शिरली आहे. ती कशी जाणार? माझ्या मनात तिचे बालपण आहे, डोळयांत तिचे रुप आहे. मी तिला कसा विसरु? मला मधुरी द्या.’

‘भिका-याची मुलगी?’
‘परंतु मी श्रीमंताचा आहे ना? माझ्याशी लग्न करुन ती श्रीमंताची होईल. बाबा, भिकारीही माणसेच ना?’
‘परंतु दरिद्री माणसांना ना मान, ना प्रतिष्ठा. श्रीमंतांच्या घरी कसे वागावे, ते त्यांना काय कळे?’

‘बाबा, गरिबांनाही स्वाभिमान असतो. पुष्कळ वेळा श्रीमंतच आपली श्रीमंती टिकावी म्हणून स्वाभिमान सोडतात. श्रीमंत भित्रे असतात. गरीब निर्भय असतात. समुद्राच्या पाण्यात जायला, झाडावर चढायला, अंधारातून जायला मला भय वाटे, परंतु मंगाला भय वाटत नसे. श्रीमंतांचे जीवन कृत्रिम, वरपांगी. त्यांच्या संपत्तीच्या भाराखाली त्यांचे खरे जीवन प्रकट न होता दडपले जाते. बाबा, माझ्या जीवनाचा खरा विकास व्हावा म्हणून गरिबाचीच मुलगी मला द्या.’

‘तुझ्याजवळ काय बोलावे कळत नाही.’

‘बाबा, सारे समजते तुम्हाला, माझे मागणे मला द्या. माझ्यासाठी मधुरीच्या बापाकडे जा. तिला मागणी घाला.’
‘मी का त्या मजुराकडे जाऊ?’

‘बाबा, ही काय तुमची घमेंड? मजूर म्हणजे का माती?  जगात मजूर नसतील तर तुमची शेतेभाते कोण पिकवील? तुमचे मळे कोण फुलवील? तुमचे बंगले कोण बंधील? तुम्हाला कोठून मिळेल अन्न, कोण हाकील नांगर? कोण हाकील मोट? कोण खणील रस्ता? कोण वल्हवील नावा? गलबतात माल कोण चढवील, कोण उतरवील? मजूर म्हणजे जगाचे प्राण, मजुराचा घाम म्हणजे जगाचे जीवन. मजूर या जगाची नाडी, जगाची फुफ्फुसे. त्यांच्यामुळे सारी दुनिया जगत आहे. मजुराकडे जाण्यात कोणती मनहानी आहे? सा-या सृष्टीत तो एक पूज्य आहे. मान त्याला द्यावा. गौरव त्याचा करावा. जा बाबा, मधुरीच्या बापाकडे आदराने जा.’

‘लोक मला हसतील.’
‘माझ्यावर तुमचं प्रेम आहे ना? मुलासाठी एवढेही नाही करणार? मी सुखी व्हावे असे तुम्हाला नाही वाटत? लग्न माझे व्हायचे. माझे जीवन सुखी व्हावे, माझा संसार गोड व्हावा, असे तुम्हांला नाही वाटत? तुमच्या मुलाच्या भावी आनंदासाठी जा.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel