‘आई, यांच्याकडे जायचे का?’
‘एखादे दिवशी जाऊ. ती म्हणाली.’

‘आणि नेहमीच राहिलो म्हणून काय बिघडले?’ सोन्याने विचारले. ‘बुधाकाका, आमच्या येथे उंदीर येतात. त्यांना मी घाबरतो. तुमच्याकडे उंदीर नाहीत ना?’

‘नाहीत.’
‘वा, मग तर छान. जायचेच.’
फराळ झाले. मुले बाहेर गेली. बुधाही जाऊ लागला.
‘जेवायला इकडेच ये. चार दिवस आता तू आमचा पाहुणा.’ मधुरी म्हणाली.
‘पाहुणा.’’

‘तशा अर्थाने नाही हो बुधा.’
‘मी आता तुझा कायमचा पाहुणा होणार आहे.’
‘का आम्ही तुझे होणार आहोत! बरे, पण दुपारी फार उशीर नको करू.’
‘वेळेवर येईन. वेळ होते तेव्हाच मी येतो.’

‘होय बुधा वेळीच सारे समजते. शोभते.’
बुधा गेला. मधुरी विचारात गर्क होती. तिने केर काढला. भांडी घासली. दुपारच्या स्वयंपाकाची ती तयारी करू लागली. तिने भाजी चिरली.

दुपार झाली आणि बुधा आला. सुंदर सुगंधी फुले घेऊन आला.
‘मधुरी, ये. तुझ्या केंसांत घालतो.’
‘बुधा, आण, मीच घालत्ये.’
‘नाही मी माझ्या हातांनी घालतो.’

त्याने तिच्या केसांत फुले घातली. तो तिच्याकडे पहात राहिला.
‘बुधा, मी कशी दिसते?’
‘गोड गोड दिसतेस.’

‘जशी दहा वर्षांपूर्वी दिसत असे, तशी?’
‘हो, तशी.’
‘काही तरीच.’
‘मला वाटते ते मी सांगितले.’

‘तुझे डोळे दहा वर्षांपूर्वीचे आहेत.’
‘असेल. तसेही असेल.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel