आधि देखत होतो सकळ ।
मग ही दृष्टी गेली आले पडळ ।
चालत मार्ग न दिसे केवळ ।
आता मज करा कृपा मी दीन तुम्ही दयाळ ॥१॥
दाते हो दान करा तुम्ही संत उदार ।
चालता मार्ग दाखवा मज निर्धार ।
गुंतलो, लोभ आशा न कळे विचार ।
दृष्टी ते फिरवूनी द्या मुखी नामाचा उच्चार ॥२॥
त्रैलोक्यात तुमची थोरी पुराणे वर्णिती साचार ।
वेदही गाती तया नकळे निर्धार ।
कीर्ती गाती सनकादिक तो दाखवा श्रीधर ।
म्हणोनि धरिला मार्ग नका करू अव्हेर ॥३॥
अंधपण सर्व गेले श्रीगुरुचा आधार ।
तेणे पंथे चालताना फिटला मायामोह अंधार ।
एका जनार्दनी देखिला परे परता पर ।
श्री गुरु जनार्दन कृपेने दाविले निजघर ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel