विषयांचे सासुरें दुश्चित बोळवण । भ्रांतीचें पांघरूण बुंथी मज ॥ १ ॥

अविवेक अंबुला अहंकार सासुरा । अविद्येच्या घरामाजीं नेलें ॥ २ ॥

तेथें कल्पना हे सासु सदा सासुरवास । घेऊं नेदी उमसु आठवण ॥ ३ ॥

आठवणे सवें आठवण आठवत । तेणें पैं फुटत ह्रदय माझें ॥ ४ ॥

कामक्रोध देख भावे आणि दीर । मज आटिताती थोर स्वभाव त्यांचे ॥ ५ ॥

मोह म्हातारा सदा द्वारीं असे । धडासी वो पिसें लावितसे ॥ ६ ॥

वरीवरी साबडा पोटीच पै कुडा । दंभ घाली खोडा प्रलोभाचा॥ ७ ॥

इच्छा आणि निंदा सासुरे दासटे । ते मज चिमटे घेपिताती ॥ ८ ॥

ममता वोहिणी नंदुला चिंता । ती भेणे एकांता मज ठाव नाहीं ॥ ९ ॥

कामाहातीं मज नाहीं हो उगडु । निष्कामासी दंडु क्रोध करी ॥ १० ॥

द्वेषाची जाचणी सदा पैं खोचणी । कोणे घरीं पापिणी बोळविलें ॥ ११ ॥

माझा भोळा भावो त्यासी नाहीं ठावो । त्यापाठीं संदेहो श्वान लागे ॥ १२ ॥

त्या भेणें पळाला मागुता नाहीं आला । देशधडी जाला भावो माझा ॥ १३ ॥

सखी माझी भक्ति भावासवें जाती । कोणा काकुळती येऊं माये ॥ १४ ॥

आर्तीचे निढळीं ठेउनी बाहुली । पहातसे वाटुली माहेराची ॥ १५ ॥

माहेराचे वाटे कोणी न भेटे । मावलीये पैठेंकोण करी ॥ १६ ॥

अक्रुरा प्रल्हादा धांव रे उद्धवा । माझ्यासाठीं धांव तुम्ही करा ॥ १७ ॥

नारदा माझ्या धाव रे लवलाही । लागेन तुझ्या पायीं जीवेंभावें ॥ १८ ॥

सत्वर हनुमंता उडी घालीं आतां । मजलागीं सर्वथा मूळ यावो ॥ १९ ॥

पृथु चक्रवर्ती जिवलग सांगाती । तुम्ही या निश्चिती मज मूळ ॥ २० ॥

पैल पुंडलीकाजवळी बापमाया । हर्शे नांदताहे भीमातीरीं ॥ २१ ॥

तेथीचे वारकरी त्याचे पाय धरी । नेउनी घाला माहेरीं पंढरीसी ॥ २२ ॥

एका जनार्दनीं सासुरचि केलें । तेंचि माहेर झालें गुरुकृपें ॥ २३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel