जोहार मायबाप जोहार । मी निर्गुणपुरीचा महार । सांगतों सारासार विचार । तो ऐका की जीं मायबाप ॥ १ ॥
कऊल वर्ष शंभर जिवाजीस दिलें घर । शिवाजी तेथें मामलेदार । अवघा कारभार । जिवाजीचा की० ॥ २ ॥
कउलांत लिहिली बोली । परंतु जिवाजी विसरले चाली । धन्याचे दरबारची शुद्धि नाहीं केली । मग पस्तावले की० ॥ ३ ॥
कऊल भरला परिपूर्ण । यमाजीचें बैसलें धरणें । जिवाजीचें उडालें ठाणें । मग दीनवदनें राहिलें की० ॥ ४ ॥
यमाजीनें धरूनी नेलें । जिवाजी आपआपणा विसरले । धन्याची बाकी विसरले । मागुती जन्मासी आले की० ॥ ५ ॥
ऐसे जन्म लक्ष चौर्यांयशी । फेरे जाहले जिवाजीसी । शरण एका जनार्दनाशी । तरीच फेरे चुकती की जी मायबाप ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.