जोहार मायबाप जोहार । मी सूर्यवंशींचा महार । सारा गांवचा करितों कारभार । सावध ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

गांव भरिला पांचांनीं । पंचवीस जाहले धनीं । आपुलाले गुंतले व्यसनीं । गेले विसरुनी धन्यासी की० ॥ २ ॥

धन्यानें हवालीं गांव केला । विसर त्याचा त्यास पडिला । शेवटीं यमाजीबावाचा टोला । गांडीवर बसेल की० ॥ ३ ॥

गांवांत वस्ती भरपूर आहे । तंववर तुम्ही हित आपुलें पाहावें । जरा आलिया उपाय । कांहीं न चाले की० ॥ ४ ॥

डोळेगांवचीं लागती कवाडें । नाकापुरी शेंबुड पडे । तोंडापूरची बत्तीस खेडें । वोस पडतील की० ॥ ५ ॥

मानगांव डगमगेल । पोटगांव पाठीस लागेल । ढोपरपुरचा मणका मोडेल । ऐशी फजिती होईल की० ॥ ६ ॥

दोन्ही टिर्‍या वाळून जातील । गांडापूर बदबदा वाहील । लिंगाची तों गडबड होईल । मेल्या कुतर्‍यासारखी की० ॥ ७ ॥

गुडघेगांवचे मेटे मोडती । पायगांव चालू रहाती । हातापुरें वाळून जाती । काय उपाय तेथें की० ॥ ८ ॥

ऐशी गांवची गडबड जाहली । ती पाहून मला दया आली । मग म्यां काढून रसायन वल्ली । आबादी केली गांवची की० ॥ ९ ॥

भक्तीचा करुनी काढा । तयासी दिधला धडपुडा । नामस्मरण निकाढा । उतारा दिला की० ॥ १० ॥

एका जनार्दनीं शरण । दिव्य उतरून रसायन । छेदूनियां भवाचें बंधन । वैकुंठीं वास करविला की जी मायबाप ॥ ११ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel