आंधळे रे आंधळे

पुण्याला पूण्यमूर्ति सेनापति बापटांवर हिंदू युवकांचा हल्ला झाला ह्या वार्तेवर प्रथम विश्वास बसेना. परंतु ती एक खरोखर घडलेली सत्यकथा होती. सेनापति बापट बेशुध्द होऊन पडले. ज्यांनी राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठीं सारें जीवन दिलें आहे, ज्यांचें हृदय गंगाजलाप्रमाणें निर्मळ आहे, बुध्दि आकाशाप्रमाणें विशाल आहे, त्या सेनापतींच्यावर पुण्यास जमलेल्या युवकांनी हल्ला चढविला. पुण्य पुरुषाचें रक्त सांडलें गेलें. निष्पाप अशा इतर तरुणांचेंहि रक्त सांडलें गेलें. सेनापति बापट व सेवानंद बाळूकाका कानिटकर यांच्यावर हल्ले झालेच, परंतु त्यांच्या मुलांवरहि झाले. सेनापतींची मुलगी कु. कमल व मुलगा वामन, सेवानंदांचा मुलगा मोरू या सर्वांवर हल्ले झाले. साम्यवादी इतर तरुणांवरहि हल्ले झाले. राष्ट्रांतील सर्वांना सुखी करूं पाहणार्‍या राष्ट्रवीरांवर हल्ला झाला. शिवाजी महाराजांनीं मान खालीं घातली असेल. सेनापतींवर अपरंपार प्रेम करणारे लोकमान्य आकाशांत खदिरांगारासारखे लाल झाले असतील. परंतु पुण्याच्या हिंदु युवक परिषदेंत जमलेल्या पुढार्‍यांनीं काय केलें ?

सेनापतींवर हल्ला होत होता, त्या वेळेस तेथें कोण होते ? स्वातंत्र्यवीर सावरकर कोठें होते ? श्री.ग.वि.केतकर कोठें होते ? लाठीबहादूर भोपटकर कोठें होते ? सेनापति हेडगेवार कोठें होते ? वीरशिरोमणि मुंजे कोठें होतें ? ते सारे निघून गेले होते. सेनापति मरून पडते तरि त्यांना त्याचें काय होय !

महाराष्ट्रांतील तरुणांनो ! तुम्ही अत:पर स्वच्छ विचार केला पाहिजे. स्वच्छ विचारांची आज जितकी जरुरी आहे, तितकी ती पूर्वी कधींच नव्हती. केवळ हिंदू हिंदू करून आतां भागणार नाहीं. सर्व राष्ट्राचा विचार केल्याखेरीज गत्यंतर नाहीं.

हा हिंदुस्थान कोणाचा ? हिंदुस्थान ज्याची पितृभू व पुण्यभू आहे त्याचा पितृभू म्हणजे काय ? पितृ ह्या शब्दाचा अर्थ संस्कृतांत मायबापं असा आहे. जो देश आपणांस पोसतो तो देश आपली पितृभू. आणि पुण्यभू म्हणजे काय ? जेथें आपण पुण्यकृत्यें करतों ती पुण्यभू. सर्वांत श्रेष्ठ पुण्यकृत्य कोणतें ? राष्ट्र स्वतंत्र असेल तर त्याचें स्वातंत्र्य राखणें व गुलामगिरींत जसेल तर त्याला स्वतंत्र करणें याच्याहून दुसरें श्रेष्ठ असें पुण्यकृत्य नाहीं.

हिंदुस्थान ज्यांना ज्यांना पोशीत आहे व हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीं जे लढावयास तयार होतील त्याचा हा हिंदुस्थान आहे. जो हिंदु राष्ट्रासाठीं लढावयास तयार नसेल त्याचाहि हा देश नाहीं. जो मुसलमान तयार नसेल त्याचाही नाहीं.

काँग्रेस आज सर्वांना लढावयास हांक मारीत आहे. स्वातंत्र्याचा लढा तीव्र करावयास सर्वांना बोलावीत आहे. सर्व प्रकारचे लोक तिच्या झेंड्याखालीं जमा होत आहेत.

काँग्रेसच्या झेंड्याखालीं मुसलमानहि आहेत. अधिकाधिक येत आहेत. अधिक यावेत म्हणून तिची खटपट सुरू आहे. ज्या खैबरखिंडींतून मुसलमानांच्या स्वार्‍या होत, त्याच खैबरखिंडींतून देशभक्तीचा वणवाहि पेटत येत आहे. सत्याग्रहाच्या चळवळींत बारा हजारांच्यावर पठाण स्वयंसेवक तुरुंगांत गेले होते व कोणत्याहि प्रांतांत हाल झाले नाहींत इतके त्यांचे झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel