सारें जग चिरफाड करण्यांत आनंद मानीत आहे. कांग्रेस ३५ कोटींना सांधवण्याचें देवाचें काम करून राहिली आहे. यश का अपयश हा प्रश्न नाहीं. गीता गर्जून सांगत आहे,

मामनुस्मर युद्ध्य च ।
देवाला स्मरून कांग्रेस लढत राहील. देवाला स्मरणें म्हणजे भारतांतील सर्व मानवप्रवाहांना एका सागराकडे घेऊन जाणें. हें देवाचें काम. सागराच्या अनंत लाटा खालीं वर होत तीराला गांठतात. काँग्रेस ही यश कीं अपयश हें न पाहतां ध्येयाला गांठण्यासाठीं धडपडत राहील.

ज्वारीचे टपोरे मोत्यासारखे दाणे असतात. परन्तु जात्याच्या दोन्ही तळी त्या दाण्याचें पीठ करतात. हिंदुमहासभा व मुस्लीम लीग या जात्यांत काँग्रेससारखी थोर संस्था का भरडून निघेल ? समजा भरडली गेली तरी तें तिचें भरडून निघणेंहि राष्ट्राला पुष्टिदायकच होईल. तें ज्वारीचें पीठ तुम्हांलाच ताकद देईल. कांग्रेसचें मरणहि जीवनप्रद ठरेल.

परन्तु कांग्रेस मरणार नाहीं. भारतांतील कोट्यवधि तरुण का बेडकांप्रमाणें चिखलांत नांदतील ? भारतीय तरुणांचा आत्मा भ्रामक अहंकारी बंधनें फेंकून व्यापक ध्येयालाच मिठी मारावयास तडफडत आहे. या तरूणांना बॅ. जिना व बॅ. सावरकर जर पिंजर्‍यांत घालूं पाहतील तर हे तरुण तें सहन करणार नाहींत. आम्हांला जुनीं बंधनें, जुने चिखल, जुनीं बरबटें नकोत, अशी ते घोषणा करतील व नव भव्य भारत बनवण्यासाठीं काँग्रेसच्या झेंड्याखालीं थोर प्रयत्न करावयास उभे राहतील.
२ जानेवारी, १९३९.

मोठी दृष्टि
आज भारतवर्षांत कोणत्या एका गोष्टीची अत्यंत आवश्यकता पदोपदीं भासत असेल तर ती मोठ्या व व्यापक दृष्टीची. संकुचितपणाचे उपासक आज सर्वत्र दिसत आहेत. या विशाल देशांत विशाल दृष्टि जर घेतली नाहीं, तर नेहमीं अडचणी व आपत्तिच येणार. मोठ्या देशांत जन्म घेणार्‍यांचें मोठें भाग्य व त्याप्रमाणेंच जबाबदारीहि मोठी. हिंदुस्थानच्या डोक्याशीं उभा असलेला उंच हिमालय सांगत आहे 'हिंदी लोकांनो, क्षुद्र वृत्ति सोडून उच्च वृत्ति घ्या.' हिंदुस्थानच्या तिन्ही बाजूंनीं उचंबळणारा हिंदी महासागर युगानुयुगें गर्जना करून सांगत आहे, 'हिंदी लोकांनो, हृदय माझ्यासारखें मोठें करा.'

परन्तु जगांतील सर्वांत मोठ्या उंच हिमालयाची किंवा उचंबळणार्‍या अनंत सागराची शिकवण अद्याप आम्ही घेतली नाहीं. कांग्रेसला ही शिकवण द्यावयाची आहे. एकच थोर व महनीय अशी ही त्यागमयी, पुण्यमयी संस्था ह्या कार्यासाठीं उभी राहिलेली आहे. परन्तु दु:खानें आणि खेदानें म्हणावें लागतें कीं कांग्रेसमधील कांहीं थोरामोठयांसहि ही व्यापक दृष्टि अद्याप यावयाची आहे.

माझे कांहीं मित्र कांग्रेसपत्रामुळे असंतुष्ट झाले आहेत. 'तुमच्या कांग्रेसपत्रामुळें आम्हांला लाजेनें खाली मान घालावी लागते. कोठें इतरत्र गेलों तर विचारतात कीं, काय हें तुमचें खानदेशांतील काँग्रेस पत्र !' वगैरे ते मजजवळ बोलले. दुसर्‍या कांहीं मित्रांनी पत्रें पाठवून कळविलें 'लाल झेंडा व तिरंगी झेंडा तुम्ही एकत्र कसा आणतां ? तुम्ही दांभिक आहांत. वरपांगीं गांधीभक्ति दाखवून गांधी तत्त्वांची तुम्हांला मनसोक्त निंदाच करावयाची आहे.'

माझ्या मित्रांचे वरील बोल व वरील पत्रें ऐकून व वाचून मला अत्यंत दु:ख झाल्याशिवाय राहिलें नाहीं. दंभ हा तर दुर्गुणांचा राजा. मी दांभिक गांधीभक्त आहें का, मी माझ्या मनांत पाहूं लागलों. मी जितका असावयास पाहिजे तेवढा गांधीभक्त नसेन. परंतु दंभ तर मला माझ्या ठिकाणीं या बाबतींत दिसेना. माझ्या मित्रांच्या हृदयांत महात्माजींबद्दल जितकी भक्ति असेल तितकीच माझ्याहि आहे. माझें हृदय फाडून दाखवतां आलें तर तेथें महात्माजींची मूर्ति दिसेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel