निर्मळपुरांत एक तरुण होता. तो फार बोलत नसे. काँग्रेसवर त्याचें फार प्रेम. तो तिच्यासाठीं जप करी, तिच्यासाठीं देवाला आळवी. तो म्हणे 'मी दुसरें काय करणार ? एवढेंच माझें काम' त्याला त्या काँग्रेसच्या सभासदांच्या गोष्टी ऐकून खिन्नता येई. त्याला असह्य दु:ख झालें. काय करावें त्याला कळेना. राष्ट्रीय सप्ताह जवळ आला होता. एप्रिल महिन्याचे ६ ते १३ तारखेपर्यंतचे दिवस. सत्याग्रहाच्या जन्माचे ते दिवस. हिंदु-मुस्लीम ऐक्याचे ते दिवस. मरणाला मारणारे ते दिवस ! ते १९१९ सालचे पुण्यदिवस ! ते आले होते. राष्ट्रांत सर्वत्र उत्साह होता. कोणी खादी विकीत होते, कां.सभासद नोंदीत होते, हरिजन-वाडे झाडीत होते, हिंदु-मुस्लीम ऐक्याच्या मिरवणुकी काढीत होते. परन्तु त्या तरुणानें काय केलें ?

त्यानें उपवास सुरू केला. निर्मळपूरच्या काँ.सभासदांत प्रामाणिकपणा यावा, राष्ट्राला शोभेसें वर्तन त्यांनीं करावें, काँग्रेसला कमीपणा त्यांनीं आणूं नये. यासाठीं त्यानें उपवास सुरू केला. तो कोणाजवळ बोलला नाहीं. तो मनांत म्हणाला,
'देवा सांगूं सुखदु:ख'

परन्तु ४ । ५ दिवस उपवासाचे झाले. तो तरुण आतां अंथरुणावरच पडून राही. त्याचे मित्र म्हणत 'काय रे, काय होतें ?' तो म्हणे 'बरें नाहीं. पडून राहतों.' एका मुलाजवळ त्यानें सर्व सांगितलें होतें. तो येई व त्याची सेवा करी. परन्तु हळुहळू वार्ता गांवांत पसरूं लागली. त्या तरुणानें मौन स्वीकारलें. तो रामनाम म्हणे. पाणी घेई. दुसरें कांहीं घेत नसे.

अन्नाशिवाय मनुष्य किती दिवस राहणार ? अन्नमय प्राण. तो तरुण खंगला. हाडें दिसूं लागलीं. हात इकडचा तिकडे करणें जड जाई. पुढें पुढें तर डोळयांच्या पापण्या उघडणेंहि कष्टाचें होई. डोळे मिटून तो पडे. नाडी बंद झाली. हृदयाचे ठोके मंद झाले. तोंडावर मंद हास्य होतें. कोणी कांहीं विचारलें तर जरा हंसे. परंतु शेवटी अखेरचा दिवस आला. पहांटेची वेळ होती. त्या तरुणाच्या लहानग्या मित्रानें प्रार्थना म्हटली. तरुणानें ऐकली. त्याच्या हृदयाशीं भारतमातेचें चित्र होतें. तिरंगी झेंड्याचें चित्र होतें. वंदे मातरम् म्हणून तरुणानें श्वास सोडला.

गांवांत वार्ता गेली. त्या लहान मुलानें तरुणाच्या उशाखालचा एक कागद खिशांत घातला. हजारों लोक जमले होते. मोठी प्रेतयात्रा निघाली. म्यु. टीचे सारे कां. सभासदहि होते. तेहि मधून मधून खांदा देत होते. मिरवणूक स्मशानभूमीवर आली. कांहींचीं भाषणें झालीं. इतक्यांत तो लहान मुलगा उभा राहिला. १४-१५ वर्षांचा तो होता. तो म्हणाला, 'याचें मृत्युपत्र मला वाचून दाखवावयाचें आहे. तें ऐका.'

सारे स्तब्ध राहिले. 'कित्येक दिवस मी दु:खी होतों. आपल्या येथें कां. तर्फे निवडणूक लढविली गेली. यश आलें परन्तु तें निर्मळ यश योग्य कारभारानें अधिक उज्वल केलें पाहिजे होतें. परन्तु उलट स्थिति होऊं लागली. मला वाटे काय करावें ? कोणतीहि संस्था तिच्यांतील लोकांत जर प्रामाणिकपणा, चारित्र्य, त्याग, निर्लोभता, शिस्त, निरहंकारता नसतील, तर ती मरेल. राष्ट्रीय सप्ताह आला तेव्हां मी मनांत म्हटलें, 'देवा तुला माझा नवस. माझा देह तुला देतों, परन्तु निर्मळपूरचे म्यु. कां. सभासद निर्मळ राख.'

तो मुलगा दूर गेला. काँ. म्यु. सभासद तेथें होते. त्यांच्याकडे लोक पाहूं लागले. शेवटीं ते सारे सभासद उभे राहिले व म्हणाले, 'आम्ही चुकलों अत:पर आम्ही काँग्रेसचें तोंड मलीन करणार नाहीं. स्वार्थ वा क्षुद्र विचार मनांत येतांच हें मुकें बलिदान आमच्या डोळयांसमोर उभें राहील. त्यांना अधिक बोलवेना. चिता पेटली. तो पुण्य-देह भस्मीभूत झाला. निर्मळपुरांतील मानसिक घडणीचेंहि भस्म झालें. त्या तरुणानें आपलें जीवन देवास दिलें. देवानें तें शतपटीनें वाढवून निर्मळपूरला दिलें !
वर्ष २, अंक १.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel