बहुजनसमाजाच्या हातीं जर आपण अधिकार आनंदानें न देऊं तर पूर्वीचा अविश्वास अधिकच वाढेल. मनें जवळ येण्याऐवजीं दूर होतील. आपण त्यांच्या हातीं अधिकार द्यावा. त्यांना प्रेमानें सूचना सल्ला द्यावी. आपली माहिती त्यांना पुरवावी. आपलें ज्ञान त्यांना द्यावें. त्यांच्याकडून काम करवून घ्यावें. आपण मान व अधिकारस्थान यांपासून खर्‍या भावनेनें दूर राहूं तर आपण सांगितलेलें ऐकलें जाईल. नि:स्वार्थ वृत्तीनें हे सांगत आहेत असें बहुजनसमाजांतील लोकांस वाटेल. आपल्या सांगण्यास तेव्हांच थोडी किंमत येण्याचा संभव आहे.

महाभारतांतील गोष्ट या प्रसंगीं ध्यानांत घ्यावी. धर्मराजाला तहान लागली होती. त्यासाठीं भीम पाणी आणण्यास गेला. तेथें यक्ष होता. यक्ष भीमास म्हणाला, 'माझ्या प्रश्नांचीं उत्तरें दे व मग पाणी ने.' भीमानें ऐकलें नाहीं. तो तेथेंच मरून पडला. मागून अर्जुन आला. त्याची तीच गत झाली. नकुळ सहदेव आले. तेहि मरून पडले. शेवटीं स्वत: धर्मराज आले. त्यांनीं यक्षाचे प्रश्नांस उत्तरें दिलीं. यक्ष प्रसन्न झाला व म्हणाला, 'धर्मा काय पाहिजे माग.' धर्म म्हणाला माझा धाकटा भाऊ सहदेव जिवंत कर.' यक्ष हंसून म्हणाला, 'धर्मा, तूं वेडा दिसतोस. भीम, अर्जुन हे तुझे पाठचे सख्खे भाऊ. मोठे शूर व पराक्रमी. नकुळ सहदेव हे माद्रीचे पुत्र. हा बावळट, लहान सहदेव उठावा असें कां मागतोस ?' धर्म म्हणाला 'जो लहान आहे तो आधीं उठूं दे.'

आपण वरच्या वर्गानीं असेंच म्हटलें पाहिजे. हे मागासलेले वर्ग आधीं उठूं दे. त्यांना उठवण्यास आपण झटलें पाहिजे. त्यांना विश्वासांत घेतलें पाहिजे. त्यांना मानानें वागवूं. त्यांना पुढें करूं. त्यांनीं विश्वासांत घेतलें पाहिजे. त्यांना मानानें वागवूं. त्यांना पुढें करूं. त्यांनीं आपल्या हातीं सत्ता असावी असे दर्शविलें तर त्यांस आपण पुन:पुन्हा जातिनिष्ठ आहांत असें म्हणणें बरें होणार नाहीं. त्यांच्या जातिनिष्ठेचा आपल्या त्यागमय, सेवामय, स्नेहमय वर्तनानें आपण त्यांना विसर पाडला पाहिजे. जातिनिष्ठ आहांत असें आपण म्हणूं तर ते अधिकच तसे होतील.

संक्रमणावस्थेंतच दक्षता लागते. नवीन अंकुर लावतांना खूप काळजी घ्यावी लागते. कोकणांत जेव्हां भाताचें रोंप उपटून त्याची पुन: लावणी करतात, तेव्हां किती चिखल करतात. जमीन पुन:पुन्हां नांगरून नांगरून तयार करावी लागते. आज बहुजन समाजाच्या अंत:करणांत राष्ट्रभक्तीचें रोंप लावावयाचें आहे. तेथें खूप खत घातलें पाहिजे. श्रध्दा, विश्वास, प्रेम हीं भरपूर आधीं ओता व मग देशभक्तीच्या भावनालतांची लावणी तेथें करा. तरच त्या वाढतील, फोंफावतील. सुंदर फळाफुलांनीं शोभतील, डोलतील.

एका क्षणांत शेंकडों वर्षांचे संस्कार कसे नष्ट होतील ? आपल्या पूर्वजांचीं पापें आहेत. वरिष्ठ वर्गांनीं आजपर्यंत बहुजनसमाजाची उपेक्षा केलीं. या वरिष्ठ वर्गाबद्दलचे बहुजन समाजाच्या मनांतील शेंकडो वर्षांचे संशय जावयास हवे असतील तर वरिष्ठ वर्गांनीं नि:स्वार्थ सेवेचे समुद्र आणून ओतले पाहिजेत. कांहीं पिढ्या केवळ निरपेक्ष निर्मळ सेवाच वरिष्ठ वर्ग जर करतील तर पुढें विश्वास उत्पन्न होईल. प्रायश्चितरूप सेवा आज आपण केली पाहिजे. त्यांच्यावर रागावून रुसून चालणार नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel