डोक्यावर गांधी टोपी घालणें म्हणजे डोक्यावर स्वातंत्र्य घेऊन नाचणें. ती गांधी-टोपी नाहीं. माझ्या भारताचें वैभव, मंगल भाग्य, येणारा उज्ज्वल भविष्यकाल, गरिबांचा आनंदी संसार, निर्मळ स्वातंत्र्य- या सर्वांचा अमृतकुंभ त्या गांधी-टोपीच्या रूपानें आपण डोक्यावर घेत आहोंत. उठा सारे आणि घ्या हे अमृतकलश डोक्यावर. सर्वांनी निश्चय करा. विजयादशमीचें सीमोल्लंघन करावयाचें आहे. सीमा ओलांडावयाचा नवीन पायंडा पाडा. या वर्षीच्या शिलंगणांत सर्वांचीं डोकीं एका गांधी टोपीनें शृंगारलेलीं दिसूं देत. सर्वांच्या डोक्यावर गांधी टोपी व डोक्यांत स्वातंत्र्याचा विचार. शुध्द खादीच्या टोप्या घालून राष्ट्रांत नवचैतन्य आणा. सर्वत्र गांधी-टोपी दिसली कीं ऐक्याची नवीन लाट उसळेल. आपण सारे स्वातंत्र्याचे शिपायी, जणूं एका ध्येयाचे, एका विचाराचे असें वाटेल. लष्करांत सर्वांचा एक पोषाख असतो. कां ? सर्वांना एकत्वाची भावना पटावी म्हणून.

'माझिया जातीचे मज भेटो कोणी'

असें प्रत्येकास वाटत असतें. ही राष्ट्रांत एक प्रचंड व्यापक जात निर्माण करा. संतांनीं त्यांच्या काळांत माळा पताका वगैरे संघटनेचें तंत्र निर्माण केलें. त्या त्या काळांतील महापुरुष संघटनेचीं नवीन तंत्रें निर्माण करतात.

मुसोलिनीचे काळे डगलेवाले, हिटलरचे पिंगट डगलेवाले तर खुदाई-खिदमतगारांचे लाल डगलेवाले. एक खूण पाहिजे. आपण निदान डोक्याची खूण तरी निर्मू या. राष्ट्रीय ऐक्याचें हें एक मोजमाप आहे. त्याला अर्थ आहे. राष्ट्रांतील लाखों लोक आज एकदम एका गोष्टीसाठीं उभे राहातात यांत अपार शक्ति आहे. आज गांधी टोपीसाठीं डोकें पुढें करणारे चार लाख लोक निघाले तर पुढें मरणासाठींहि डोकें पुढें करणारे चार लाख निघतील अशी आशा वाटूं लागते.

लहानशा गोष्टीसाठीं तरी लाखों लोक एकदम उभे राहातात असें दिसलें तर ती क्षुद्र गोष्ट कोणी समजूं नये. परकी सत्तेला तो गंभीर इशारा आहे. राष्ट्राला ती आशेची खूण आहे. उठा सारे आणि घरींदारीं, गल्लीगल्लींत, शाळा कॉलेजांत, खेड्यांत व शहरांत, बाजारांत व देवळांत गांधी टोपीचें राज्य करा. गांधी टोपीचें राज्य करून दाखवा म्हणजे इंग्रजांचें राज्य येथून दूर करण्यास स्फूर्ति आल्याशिवाय राहणार नाहीं. वंदे मातरम्.
१९ सप्टेंबर, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel