काँग्रेसची कसोटी

हिंदु महासभा व मुस्लीम लीग यांनीं काँग्रेसला पकडींत धरून नष्ट करण्याचा दुष्ट कारभार चालविला आहे. तिकडून बॅ. जिनांनीं रागारागानें म्हणावयाचें, 'काँग्रेसला हिंदु राज्य स्थापावयाचें आहे.' इकडून बॅ. सावरकर म्हणतात, 'काँग्रेस ही मुसलमानांची मिंधी आहे.'

पर्वतावर कितीहि लाटा आदळल्या तरी पर्वत अचल व अभंगच राहील. तो आपले पाताळांत रोंवलेले पाय व आकाशाला भिडलेलें मस्तक तसेंच राखील. काँग्रेसचे पाय बहुजनसमाजाच्या सेवेंत रोंवलेले आहेत. सर्व भारतीय ऐक्याच्या दिव्य ध्येयाच्या आकाशांत तिनें आपलें शिर स्थिर ठेवलें आहे. हिंदुस्थानचे तुकडे करण्याचें पाप काँग्रेस कोणाला करूं देणार नाहीं. जगांतील सर्व संस्कृति व सर्व धर्म भारतांत येऊन त्यांचें एक मधुर, मनोहर सहस्त्ररंगी संमिश्रण भारतभाग्यविधात्यास बनवावयाचें आहे. भारतीय इतिहासांतील हे सोनेरी सूत्र जो हातीं घेईल त्यालाच भारतीय इतिहासाचें मर्म समजलें असें म्हणतां येईल.

काँग्रेसनें हें ध्येय आपल्यासमोर ठेवलें आहे. मी एकदां पुण्याहून आगगाडींत बसून येत होतों. एक विद्वान् गृहस्थ मजजवळ बोलत होते. ते म्हणाले, 'अशानें तुमची काँग्रेस नाहींशी होईल.' मी त्यांना म्हटलें, 'मरण तर सर्वांनाच आहे. थोर ध्येय ठेवून, त्याच्यासाठी अखंड श्रमून, झिजून, जर मरण आलें तर तें मरण नसून जीवनच आहे. क्षुद्र व संकुचित ध्येय डोळयांसमोर ठेवून जगणें यांत काय भाग्य ? काँग्रेससारख्या संस्थेला का डबक्यांत बुड्या मारावयास लागणार ? भारतांतील ३५ कोटी लोकांच्या ऐक्याच्या ध्येयभूत सागरांत ती बुड्या मारीत राहील व स्वातंत्र्याचें मौक्तिक मिळवण्याची पराकाष्ठा करील.'

काँग्रेस अमर आशा उराशीं ठेवून भारतांत अपूर्व गोष्ट घडवून आणण्यासाठीं धडपडेल. तिच्या धडपडीला अंती यश आल्याशिवाय राहणार नाहीं. एकीकडें जिनांचा जळफळाट चालला आहे. परंतु त्याच वेळेस पंजाब व बिहार येथील सभांतून दुसरे थोर मुस्लीम पुढारी सर्व मुस्लीम बंधूंस काँग्रेसमध्यें सामील होण्यास सांगत आहेत. मुर्शिदाबाद येथें मौ. अश्रफुद्दिन म्हणाले, 'इंग्रजांच्या १५० वर्षांच्या राज्यांत इस्लामला धोका आला नाहीं. आतां काँग्रेसच्या हातांत मंत्रिमंडळें आलीं म्हणून का दोन वर्षांत धोका आला ? इस्लामला धोका अशी ओरड करून सर्वसाधारण मुसलमान जनतेला फसवण्याची कांहीं मुसलमान पुढार्‍यांची सांप्रतची वृत्ति आहे. ही वृत्ति कल्याणाची नाहीं. ही वृत्ति भेकडपणाची आहे. हिंदुस्थानांतील सर्व समाजांना खाजगी राष्ट्रीय जीवनधर्म कायम राखून नवीन सुधारणा व संस्कृति घडवून आणण्याचे बाबतींत मदत करणें शक्य आहे. कोणत्याहि अटी न घालतां कांग्रेसच्या स्वातंत्र्याच्या लढ्यांत मुसलमान बंधूंनीं सामील व्हावें.'

मुसलमान बंधूंतहि असा सुंदर ध्येयवाद आहे. हीच आमची आशा आहे. भारतांतील सर्व नव युवकांनीं हीच दृष्टि घेतली पाहिजे. आम्हांला ३५ कोटींचा हिंदुस्थान पाहिजे आहे अशी घोषणा तरुणांनीं नाहीं करायची तर कोणी ? कांग्रेसच्या झेंड्याखालीं किती मुसलमान येतात हें नका पाहूं. तुम्ही हिंदु तर या सारे. तुम्ही आलेत म्हणजे तेहि येतील; आल्याशिवाय राहणार नाहींत. भारताच्या अभंग ऐक्याची दृष्टि घेऊन उभा राहील तोच खरा भारतीय. या विशाल ऐक्यासाठींच भारत जगला आहे व जगेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel