भविष्यदर्शन कीं सुखस्वप्न

अहिंसेचें उदात्त उपनिषद् मानवी जीवनांत दाखल व्हावें ही महात्मा गांधींना तहान आहे. दिवसेंदिवस हा त्यांचा ध्यास उत्कट होत आहे. नुकतेच ते वायव्य-सरहद्द प्रांताचा दौरा करून आले. हा प्रांत म्हणजे आपल्या यात्रेचें फिरून फिरून जाण्याचें स्थान असें त्यांनीं गौरवानें म्हटलें आहे. पुन्हां कदाचित् ते तिकडे जातील. श्रीमती मिराबेन ह्यांना त्यांनीं तिकडे सेवेसाठीं पाठवलेंच आहे.

वायव्य प्रांतांत आज अधिक गोंधळ माजला आहे. महात्माजींसमोर अनेक शिष्टमंडळे आलीं. अनेकांजवळ त्यांनीं चर्चा केली. सरहद्दीपलीकडच्या जाती या प्रांतांत वरचेवर घुसतात. दिवसाढवळ्या लुटालूट करतात, माणसें पळवतात. या प्रांतांत काँग्रेसनें अधिकारस्वीकार केल्यापासून हे प्रकार वाढत आहेत. याचें कारण लष्कर व पोलिस यांच्यावर असावा तितका अधिकार येथील सरकारला नाहीं. शिवाय पोलिसांचा पुन:पुन्हां उपयोग करावयास काँग्रेस सरकार कचरतें. महात्माजींनीं सांगितलें 'अशा परिस्थितींत डॉ.खानसाहेब यांनीं राजीनामा वेळ आली तर दिला पाहिजे.'

सरहद्द ब्रिटिश सरकारचें धोरण चुकीचें आहे. महात्माजी तरी काय करणार ? ते म्हणाले, 'माझ्याजवळ कांहीं यक्षिणीची कांडी नाहीं. मला चमत्कार करतां येत नाहीं. सरहद्दीवरचे लोक लुटालूट कां करतात ? अन्नवस्त्र मिळालें नाहीं म्हणजे मनुष्य अत्याचारास प्रवृत्त होतो. या लोकांना धंदा देऊन स्वावलंबी करणें हाच याला मार्ग आहे. मला जर या लोकांत जाऊं दिलें तर त्यांना मी अहिंसक बनवीन, शांत करीन.'

वायव्य सरहद्द प्रांतांत या प्रश्नासाठीं महात्माजी गेले नव्हते. ते एक लाख खुदाई खिदमतगारांचा निकट परिचय करून घेण्यासाठीं गेले होते. अब्दुल गफारखान हे देवाचे सेवक आहेत. अहिंसा त्यांचा प्राण आहे. त्यांच्या अनुयायांची श्रध्दा आहे का हें पाहण्यास महात्माजी गेले होते. या स्वयंसेवकांची पुढार्‍यावर श्रध्दा आहे. परन्तु व्यक्तीवरची श्रध्दा शेवटीं तत्त्वावर बसावी लागते. 'बुध्दं शरणं गच्छामि' ही पहिली पायरी. ही पायरी चढून शेवटीं 'धर्मं शरणं गच्छामि' या स्थितीवर जाणें जरूर असतें.

महात्माजीं हें पहावयास आले होते. या सेवकांजवळ ते बोलले. ते म्हणाले, 'बंदुक टाकून दिल्यामुळें तुम्हांस दुबळें वाटत असेल, तर बंदूक हातीं धरा. अहिंसावादी बनल्यामुळें आपण अधिक बलवान झालों असा प्रत्यय आला पाहिजे.' महात्माजींनीं खुदाई खिदमतगारांस सरहद्दीपलीकडच्या लोकांत जाऊन सेवा करावयास, तेथें अहिंसेचें साम्राज्य पसरविण्यास सांगितलें. ते म्हणाले, 'सरहद्दीचाच नव्हे तर हिंदुस्थानच्या स्वराज्याचा प्रश्न तुमच्यावर, तुमच्या शांततापथकावर अवलंबून आहे.'

महात्माजींच्या या शब्दांत अधिक अर्थ आहे असें मला वाटतें. आज जगभर युध्दाचे वारे सुटले आहेत. भीषण छाया युरोपवर व जगावर पसरली आहे. जर्मनी, जपान, व इटली यांचा भस्मासुर दुबळ्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचें भस्म करण्यासाठीं सरसावला आहे. अबिसिनिया अस्तास गेला. स्पेनला फांशी देण्याचें काम चाललें आहे. चीनला जपान चिरडूं पहात आहे. झेक राष्ट्रास झोडपण्यांत आलें. आस्ट्रिया खाण्यांत आला. ज्यू लोकांवर अंगावर कांटा आणणारे अत्याचार होत आहेत. महात्माजी लिहितात, 'एका सर्व जातीचा उच्छेद मांडला असतां जर त्या जातीच्या संरक्षणार्थ युध्द पुकारलें तर तें समर्थनीय ठरेल.' परंतु युध्दाचा मार्ग गांधीजींचा नाहीं. ते कोणता सल्ला देतात ?

ते लिहितात, 'ज्यूंना जर्मनी जर हांकलीत असेल तर ज्यूंनीं सांगावें  'आम्हीं येथें जन्मलों. जर्मनी आमचीहि मायभूमि आहे. वाटलें तर आम्हांस गोळी घालून ठार करा. आम्ही येथून जाणार नाहीं.' अशा प्रकारचा ज्यूंनीं सत्याग्रह करावा.' परंतु त्याबरोबर ज्यूंना एक सूचना महात्माजींनीं दिली आहे. 'आज पॅलेस्टाइनमध्यें ब्रिटिश बंदुका अरबांचे प्राण घेत आहेत. ज्यू लोकांनीं या गोष्टीस आळा घातला पाहिजे. ब्रिटिशांच्या लष्कराची मदत घेऊन त्यांनीं अरबांस सतावूं नये. पॅलेस्टाइनमध्यें त्यांनीं लष्कराची मदत घेऊन त्यांनीं अरबांस सतावूं नये. पॅलेस्टाइनमध्यें त्यांनीं अरबांजवळ प्रेमानें रहावें. जर ज्यू अरबांचा छळ इंग्रजांकडून करवतील तर ज्यूंचा जर्मनी छळ करतो, याबद्दल त्यांना कुरकुर करतां येणार नाहीं.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel