कांग्रेसच्या झेंड्याखालीं कालपर्यंत जे नव्हते ते आज येतांक्षणींच जातिभेदातीत कसे होतील ? जातिभेद हे हजारों वर्षें आपल्या रोमरोमांत भिनले आहेत. एका क्षणांत ते जाणें शक्य नाहीं. प्रांतिक, धार्मिक, जातीय असे शेंकडो प्रकारचे भेदभुंगे राष्ट्रीय जीवन पोखरून टाकीत आहेत. ब्राह्मणेतरांनाच कशाला नांवें ठेवूं ? असेंब्लीचे निवडणुकीचे वेळेस देशस्थ ब्राह्मण कोकणस्थास व कोकणस्थ ब्राह्मण देशस्थास मतें द्यावयास तयार नसत. ऋग्वेदी यजुर्वेदी माणसास मत देत नाहीं. यजुर्वेदी ऋग्वेद्यास मत देणार नाहीं. वरपासून खालपर्यंत सर्वत्र भेदाचें हें भीषण भूत हैदोस घालीत आहे. भेदभूत मारावयाचें असेल तर निरपेक्ष सेवा करणारे, मानापमानास विसरणारे सर्व जातींतून शेंकडों लोक निघाले पाहिजेत. वरिष्ठ वर्गांतून तर आधीं निघाले पाहिजेत.

काँग्रेसच्या झेंड्याखालीं जे आले, त्यांच्यावर आपण विश्वास टाकूं या. त्यांच्याकडे जाऊं येऊं या; त्यांच्याजवळ ऊठूं बसूं या; बोलूं चालूं या. त्यांना मनापासून मोठेपणा देऊन त्यांचें कौतुक करूं या. प्रेमानें त्यांना सांगू या, 'काँग्रेसच्या झेंड्याची अब्रू राखा. सेवा करा. स्वार्थ नको, लांचलुचपत नको. वशिले नकोत. जनतेचें कल्याण पहा. तुमच्या हातांत झेंड्याची अब्रू आहे. अब्रू दवडाल तर भूमातेच्या तोंडाला काळें फासाल. जपून जबाबदारीनें वागा. आम्ही आहोंतच तुमच्याजवळ. तुम्हांस मदत देऊं, सूचना करूं, माहिती देऊं. कसें वागावें तें सांगूं.'

आजच्या संक्रमणावस्थेंत हाच खरा उपाय आहे. अशानेंच आजपर्यंत अविश्वासानें एकमेकांपासून दूर राहिलेले बंधू एकत्र येतील. हृदयें हृदयांस मिळतील. सार्वजनिक जीवन निर्मळ होईल. अधीर व निराश होऊन चालणार नाहीं. आपण सारे एकत्र येणार, ध्येयनिष्ठ होणार. लवकरच स्वातंत्र्य संपादणार या अमर आशेनें आपण सारे वागूं या.
१९ डिसेंबर, १९३८.

एकजूट
अमळनेरला २६ तारखेपासून संयुक्त खानदेश कामगारपरिषद भरणार आहे. हा अंक प्रसिध्द होईल त्या दिवशीं परिषद सुरू झालेली असेल. ही परिषद एका दृष्टीनें अपूर्व आहे. महाराष्ट्रांत क्वचितच दिसून येणारी अशी एक महत्त्वाची वस्तु येथें दिसून येईल. ही परिषद कामगारांची असली तरी हजारों किसानहि या सभेस उत्सुकतेनें हजर असलेले दिसतील. किसान व कामगार अशा या दोन प्रचण्ड शक्तीचें मधुर संमेलन कोणाला आनंद देणार नाहीं ? परन्तु या दोन शक्तींत तिसरीहि एक शक्ति मिसळलेली दिसेल. सुरतेला जी नुकतीच विद्यार्थी परिषद भरली, त्या परिषदेला महाराष्ट्र व कर्नाटकांतून जे प्रतिनिधी गेले, त्यांतील बरेचसे अमळनेरला आलेले दिसतील. हा नवविचारानें संपन्न, उत्कट ध्येयवादानें रंगलेला असा तरुणसंघहि या किसान कामगार परिषदेंत समरस झालेला पाहून राष्ट्राच्या भावि उज्वल भवितव्याची आशा वाटूं लागते. कामगार, किसान व सुशिक्षित ध्येयवादी, क्रांतिवादी तरुणवर्ग यांच्याच एकजुटींतून खरें स्वातंत्र्य समोर येऊन उभें राहील.

या तीनहि वर्गांत गेल्या वर्षांत प्रचण्ड संघटना होत आहेत. कामगारांच्या गेल्या वर्षांतील चळवळी रोमहर्षण आहेत. कलकत्त्याच्या लाखों जूट कामगारांचा संप, कानपूरचा लाखों कामगारांचा तो ४० दिवस चाललेला भव्य दिव्य झगडा, यांची कोणाला विस्मृति पडेल ? मद्रासच्या ट्राम्बेमधील कामगारांचा संप, ठाणें जिल्ह्यांतील आगपेटयांच्या कारखान्यांतील संप, पंजाबांतील शाली वगैरे तयार करणार्‍या कारखान्यांतील संप, सर्व देशभर कामगार कमर कसून उभा राहिलेला दिसून येतो. बहुतेक ठिकाणीं कामगारांनीं यशहि मिळविलें. आपल्या खानदेशांतील दिव्य झगडे आपण विसरणार नाहीं. पगार न घेतां पोट पाठीशीं बांधून आपण पगारवाढीचा लढा चालविला. धुळ्याचा लॉक ऑऊट आपण खोलला. आपली संघटना वाढली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel