या चरणाचा हा असा अर्थ आहे. प्राचीनकाळी पित्याचा जो वर्ण तोच मुलाचा असें ठरविलें होतें. कारण लहानपणापासून जें घरांत पाहील, आजुबाजूस असेल तेंच मुलगा उचलील. परंतु आपण पुढच्या काळांत आहोंत. निरनिराळ्या शिक्षणपद्धती निघाल्या आहेत. एकाच आईबापांची निरनिराळ्या गुणधर्माचीं मुले असतात. त्या सर्वांचा एकच वर्ण नसतो. कोणी चित्रकार होतो. कोणाला फुलाफळांची, शेतीची आवड असतें तेव्हा ज्यानें त्यानें आपल्या वृत्तीनुरूप स्वधर्म उचलावा. तो स्वधर्म आचरतां आचरतां हा देह झिजवावा. सर्वत्र भरलेल्या आत्मस्वरूपाची जाणीव ठेवून, स्वधर्माचरण करण्यासाठी देहाचें हें साधन लाभलेलें. या देहाच्या साधनानें स्वधर्म आचरीत सर्वत्र भरलेल्या परमात्म्याची कर्ममय पूजा आपणांस करावयाची आहे.

आत्मा अखंड आहे. देह नाशिवंत आहे व स्वधर्म अबाध्य आहे हे तीन सिद्धान्त गीतेनें सांगितले. परंतु केवळ शास्त्र सांगून भागत नसतें. शास्त्र जीवनांत आणण्यासाठी कवि हवा. स्वधर्म आचरा असें सारेच धर्म सांगतात. परंतु गीता सांगते “स्वधर्म तर आचरच. परंतु फलेच्छा सोडून निष्काम वृत्तीनें तो स्वधर्म आचर.” कृष्ण म्हणतात:
“एषा ते ऽ भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु” तुला सांख्यशास्त्र सांगितलें. आतां योग सांगतों ऐक. आणि योग म्हणजे काय?

“योग: कर्मसु कौशलम्”

कर्म करण्याची कला म्हणजे योग. कर्म उत्कृष्ट असें हातून कधी होईल? जेव्हां सारखे त्या कर्मातच रमू, फळाचे चिंतन करीत न बसतां साधनेंतच तन्मय होऊं तेव्हां. असें कर्म करण्यांत एक प्रकारचा परम आनंद असतो. कृतार्थता असते. तेथे निराशा शिवत नाही.

असें निष्काम कर्माचरण करणारा पुरूष कसा असेल? या देहानें आपल्या स्वधर्माचरणाच्या निष्काम सेवेनें समाजरूपी परमेश्वराची पूजा करणारा तो अनासक्त कर्मयोगी, तो कसा बरें असेल?

जीवनाचें शास्त्र सांगून, निष्काम बुद्धिनें कर्म करण्याची कला सांगून, हे शास्त्र व ही कला ज्याच्या जीवनांत प्रकट होत असते अशा स्थितप्रज्ञाची मूर्ति भगवंतांनी दुस-या अध्यायाच्या शेवटीं उभी केली आहे. गीताशास्त्र दुस-या अध्यायांत जणुं संपलें. पुढचे अध्याय म्हणजे विस्तार आहे. दुस-या अध्यायाला कोणी म्हणूनच एकाध्यायी गीता म्हणतात. दुस-या अध्यायांतीलच हे विचार पुढें अधिक विस्तारानें मांडले आहेत. ते हळुहळूं पाहूं चला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel