ती नीट ठेवतों. अर्जुनाची प्रतिज्ञा होती की “समाजाचें रक्षण करणारें जें माझे गाडीव धनुष्य त्याची कोणी निंदा करील, तर तें मी सहन करणार नाही.” अर्जुनाच्या सेवेचें तें साधन होतें. बायका चुलीला, केरसुणीला, जात्याला पाय लावूं देणार नाहीत. मुलाचा पाय लागला तर नमस्कार कर म्हमतील. पंडित आपल्या पुस्तकांना पाय लावूं देणार नाही. दसरा आला तर शेतकरी नांगराची पूजा करीत; शिंपी शिवण्याच्या यंत्राला झेंडूच्या माळा घालील; मोटारवाला मोटार सजवील. या सर्वांचा अर्थ काय? याचा अर्थ इतकाच की ही क्षरसृष्टि, ही सारी साधनें ही पवित्र आहेत. पुरूषमय आहेत. जणुं चैतन्यमय आहेत.

क्षरसृष्टि म्हणजे पुरूष आणि या क्षरसृष्टित वावरणारा हा अ-क्षर जीव हाहि पुरूषच. हा अक्षर जीव मागील जन्मीं होता, या जन्मीं आहे. पुढील जन्मींहि उभा असेल. सेवा करतां करतां दमणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात “सुखें घालावे जन्मासी.” पुन्हां पुन्हां सृष्टींत जन्मून सेवा करण्यासाठी हा जीव उभा असतो. क्षरसृष्टीतील विपुल, विविध साधनें पाहून त्याला आनंद वाटतो.

क्षरसृष्टि म्हणजे पुरूष. अक्षर जीव म्हणजे पुरूष. आणि या सर्वांना व्यापून असणारा तो पुरूषोत्तम. सारें विस्व जणुं पुरूषमय. सारें चैतन्यमय. सर्वत्र एकच सुगंध. सर्वत्र एकच आनंद. अमृतानुभवांत ज्ञानेश्वर म्हणतात “लेण्यामध्यें दगडाच्या देवाची दगडाचा भक्त दगडाच्याच फुलांनी पूजा करतो असें दिसतें. त्याप्रमाणें एकाच चैतन्याचे क्षर, अक्षर. पुरूषोत्तम हे सारे प्रकार.”

सर्वत्र हें असें धन्य दर्शन होणें याहून पवित्रमय काय? तुकाराम महाराज म्हणतात:

“ऐसें भाग्य कई लाहता होईन
अवघे देखें जन ब्रह्मरूप ।।

मग तया सुखा अंत नाही पार
आनंदे सागर हेलावती” ।।


अशी ती परमदशा आहे. “वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरें” असें होतें. सर्वत्र आपणच भरून राहिलों आहोंत असा अनुभव येतो. डोळ्यांतून आनंगाश्रू घळघळतात. अंगावर रोमांच उभे राहतात.

याहून अधिक थोर विचार तो कोणता ? याहून अधिक उदात्त तत्त्वज्ञान तें कोणतें ? येथें परमावधि झाली. पंधराव्या अध्यायाच्या शेवटी म्हणून भगवान् म्हणतात:

“इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तमयाऽनघ”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel