अध्याय १५ वा
पंधराव्या अध्यायाला ‘पुरूषोत्तमयोग’ म्हणतात. हा अध्याय अत्यन्त पवित्र मानला जोतो. त्याचा रोज पाठ करतात. या अध्यायाला एवढें पावित्र्य कां? कारण जीवनाचें संपूर्ण शास्त्र येथें सांगितलें आहे.

या अध्यायांत तीन पुरुष सांगितले आहेत:

१ क्षरसृष्टि हा एक पुरुष.
२ शरिरांत वावरणारा जीव हा दुसरा पुरुष.
३ आणि या दोन्ही पुरुष व्यापून असणारा तो तिसरा पुरुष- पुरुषोत्तम.


क्षरसृष्टि म्हणजें ही नाशिवंत सृष्टि. बदलणारी सृष्टि. नवीन नवीन रूपें धारण करणारी सृष्टि. क्षरता हें सृष्टिचें दूषण नसून जणुं भूषण आहे. सदैव बदलतें तेंच सनातन. “सनातनो नित्यनूतन:” या या क्षरसृष्टींतून सेवेची साधनें आपणांस मिळत असतात. म्हणून ही क्षरसृष्टि पवित्र मानावयाची. तिलाहि पुरूष म्हणजे जणुं चैतन्यमय मानावयाचें. रोज तीच तीच फुलें असती तर भक्ताला पूजेचा आल्हाद वाटला नसता. म्हणून निरनिराळ्या ऋतूंत निरनिराळी पुष्पें. कधी बकुळीची फुलें, तर कधी पारिजातकाची’ कधी कमळें फुलली आहेत, तर कधी गुलाब मोगरे. क्षरसृष्टिचें हे असे  भाग्य आहे. सदैव पौर्णिमाच असती तर आपण कंटाळलों असतों. परंतु कधी बीजेची सुंदर चंद्रकोर असते, कधी अष्टमीचा चंद्र. कधी पौर्णिमा तर कधी अमावस्या. पौर्णिमेला चंद्राचें संपूर्ण साम्राज्य, तर अमावस्येला ता-यांना संपूर्ण स्वातंत्र्य. चंद्राची ही क्षरता आनंददायक आहे.

कधी रिमझिम पाऊस पडत आहे, कधी मुसळधार पाऊस, नद्या-नाले भरलें आहेत. खळखळाट पाणी वहात आहे. कधी सुंदर ऊन, कधी गुलाबी थंडी. कधी वादळ होऊन सारी सृष्टि जणुं नाचूं लागते, तर कधी केवळ शांत असतें. अशी ही सृष्टीची मौज आहे. क्षरतेमुळें हें वैचित्र्य-वैभव आहे.

समाज बदलतो आहे. साधनें बदलत आहेत. जुनी साधनें गेली. नवीन आली. बैलगाड्या कमी झाल्या. मोटारी आल्या. सेवेची साधनें बदलली तरी सेवा करायचीच आहे. आपलें शरिरहि बदलतें. लहान होतें हें शरीर. मोठें झालें. सात वर्षांत शरिरांतील सारे अणुपरमाणू म्हणे बदलतात. म्हणून शरिर सतेज राहतें. सेवा करतां येते.

क्षरसृष्टि म्हणजे सेवेची साधनें. या क्षरसृष्टीला पुरुष माना. तिला तुच्छ नका मानूं. तिला पवित्र माना. म्हणजे काय? चरखा माझ्या सेवेचें साधन आहे. त्याला मी नीट माळ घालीन. तेल देईन. हें सेवेचें साधन स्वच्छ ठेवीन. त्याची उपेक्षा करणार नाही. मोटार माझ्या सेवेचें साधन. मोटारींने मी लोकांना नेतों. ही मोटार नीट ठेवीन. टायर नीट आहेत की नाहीत तें पाहीन. पेट्रोल आहे की नाही पाहीन. नाही तर उतारूंचे हाल होतील. ते उतारू म्हणजे माझा भगवान्. त्याची सेवा करण्याचें साधन म्हणजे ही माझी मोटार नीट ठेवूं दे. हा नांगर माझ्या सेवेचें साधन. हें जातें, गी केरसुणी, ही चूल, हें पुस्तक सारी सारी त्यांची सेवेची साधनें. ही साधनें आपण पवित्र मानतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel