अध्याय ९ वा
नववा अध्याय अति पवित्र अध्याय. गंगेचा साराच प्रवाह पवित्र असतो. उगमापासून मुखापर्यंत सारा प्रवाह पवित्र असतो. तरिहि हरिद्वार, काशी, प्रयाग अशी तीर्थें आपण मानिली आहेत. तेथली गंगा अधिकच पवित्र. तसे गीतेचे अठराहि अध्याय पवित्रच. परंतु त्यांतहि पुन्हां नववा अध्याय, बाराव्या अध्याय, पंधराव्या अध्याय वगैरे अधिक पवित्र. नवव्या अध्यायाचा जप करीत अनेकांनी समाधी घेतल्या. ज्ञानेश्वर महाराज नववा अध्याय म्हणताच समाधिस्थ झाले असें म्हणता. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर म्हणतात “नवव्या अध्यायाची वेदांनाही जणुं भीति वाटते.” इतका हा अध्याय थोर आहे. पवित्र आहे.

या अध्यायाचें इतकें महत्त्व कां? कारण येथें अनुभवाला येणारा राजमार्ग दाखविण्यांत आला आहे. भगवान् म्हणतात “अर्जुना, तुला प्रत्यक्षावगम असा धर्म देतों. जी गोष्ट सांगोवांगीची नाही, तर प्रत्यक्षबगम असा धर्म देतों.” जी गोष्ट सांगोवांगीची नाही, तर प्रत्यक्षबगम आहे. तुमच्या आमच्या अनुभवास येणारी आहे.

अशी कोणती गोष्ट या अध्यायांत सांगितलेली आहे? देव म्हणतात “अर्जुना, जें कांही कर्म करशील तें ईश्वरार्पणबुद्धिनें कर.” याचा अर्थ काय? आपण जीं जीं कर्में करतों, त्या कर्मांचा संबंध जनतेशी असतो. ती कर्मे जनताजनार्दनाला मिळत असतात. ज्यांच्या ज्यांच्याशी आपल्या कर्माचा संबंध येईल त्यांना त्यांना देव मानणें म्हणजे ईश्वरार्पणबुद्धिनें कर्म करणें.

भक्त आपली स्वधर्मकर्में या दृष्टिनें करतात. गोरा कुंभार मडकी घडवी. ती मडकी चांगली व्हावी म्हणून तो माती किती तुडवी. माती तुडवितां तुडवितां तो तन्मय होऊन जाई. स्वत:चे मूल मातीत तुडवलें गेलें तरी त्याला भान नाहीं. ती माती तुडवीत असतां जणुं परमेश्वर त्याच्या मनच्क्षूसमोर होता. हा कोठला परमेश्वर? मडकी विकत घेणारे लोक म्हणजेच त्याचा परमेश्वर. गो-या कुंभाराला दुसरा देव जणुं माहीत नाही. माझा नारायण मडकी विकत घ्यायला येईल, त्याला का फसवूं? लौकर फुटणारे मडकें का त्याला विकूं? असें पक्कें मडकें त्याला देईन
की त्याच्या मुलालाहि तें पुढें पुरेल. अशा भावेनें गोरा कुंभार मडकी तयार करी.

कबीर याच भावनेनें शेले विणी, वस्त्रें विणी. माझा परमेश्वर ही वस्त्रें घ्यायला येईल. त्याच्या अंगावर का वेडीवांकडी वस्त्रें घालूं? नाही, ही वस्त्रें मला नीट विणूं दे. काळजीपूर्वक विणूं दे.

सांवता माळी याच भावनेनें भाजी विकायला आणी धुऊन, निवडून तो भाजी घेऊन येई. भाजी घ्यायला येणारें गि-हाईक म्हणजे जणुं त्याचा भगवंत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel