अध्याय १४ वा
तेराव्या अध्यायांत सदगुणांची सेती करावी असें भगवंतांनी सांगितले. हे सदगुण म्ङणजेच ज्ञान, अशी ज्ञानाची व्याख्या केली. परंतु या चौदाव्या अध्यायांत आणखी फोड केली आहे. अधिक खुलासा केला आहे.

या जगांत सर्वत्र सत्त्व, रज व तम या तीन गुणांचा पसारा आहे. आपण या तीन पाशांत जखडलेले असतो. ही त्रिगुणात्मक माया आपणांस अंतर्बाह्य वेढून आहे. या मायेचे पाश कसे तोडावयाचे ?
या बंधनांतून कसें मोकळें व्हायचें ?

या तीन गुणांतील तमोगुण जो आहे तो अजिबात नष्ट केला पाहिजे. तमोगुण म्हणजे अनवधानता. आपल्या देशांत या तमोगुणाचें साम्राज्य पार. एकादी गोष्ट करण्याचें कबूल करतात आणि खुशाल विसरलों म्हणतात ! हा विस्मृतीचा जो ?? आहे तो तमोगुणांतून जन्मतो. विसरणें हा मनाचा आळस आहे. महात्माजींनी मॉडर्न रिव्ह्यूसाठी लेख लिहावयाचें एकदां कबूल केलें होतें. १९३० सालची ती अमर दांडीयात्रा सुरू झाली होती. महात्माजींना क्षणाची उसंत नव्हती. रोज त्यांना लेख लिहायची आठवण होई. ते म्हणायचे “लेख लिहायचें राहिलें.” शेवटी एकदां त्यांनी वेळ काढून तो लेख लिहिला. या लेखाची गंमत अशी झाली की तो चुकून केराच्या टोपलींत गेला ! मॉडर्न रिव्ह्यूच्या संपादकांचे पुन्हां पत्र आलें “लेख पाठवां.” महात्माजींचे उत्तर गेलें की लेख कधीच पाठवला. मग तिकडे शोधूं लागले. शेवटी तो छोटा लेख सांपडला.

महात्माजी असे दक्ष असतात. बेळगांव कॉंग्रेसच्या वेळेस तेथेंच राष्ट्रीय-शिक्षण-परिषदहि भरली होती. महात्माजी तेथें होते. एक ठराव वाचून दाखविण्यांच आला. तेथें जमलेल्या प्रतिनिधीपैकीं एक तरूण असे प्रतिनिधि म्हणाले “माझें जरा लक्ष नव्हतें. ठराव फिरून वाचून दाखवावा.” त्याबरोबर महत्माजी म्हणाले “तुम्ही अधिक लक्ष दिलें पाहिजे होतें.”

सावधानता, दक्षता, नीट काळजीपूर्वक काम करणें, हे सारें सत्त्वगुणांत येतें. विनोबाजी एकदां म्हणालें “महात्माजींनी हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी दिल्लीस २१ दिवसांचा उपवास केला त्या वेळेस तेथें सर्वधर्मपरिषद भरली होती. सकाळची ९ वाजतांची वेळ होती. परंतु ९ वाजतां मंडपांत फक्त दोनच माणसें होती ! अ‍ॅनी बेझंट व मी.” आपणांस कसें तरी गबाळ्यासारखें वागण्याची सवय लागली आहे. बावळटपणा म्हणजे साधुता नव्हे. एका पैची चूक पडत होती तर एकनाथ रात्रभर बसले. आळस हा भयंकर शत्रु आहे.

“आळस उदास नागवणा”


असें समर्थांनी म्हटलें. आळसामुळें सा-या जीवनाची माती होते. आळस, निद्रा, अनवधानता, भीति, इत्यादि सारे तमोगुणाचेच प्रकार ज्याला मोक्षार्थी व्हावयाचें आहे, त्यानें तमोगुण जिंकून घेतला पाहिजे. तमोगुण सफा दूर केला पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel