अध्याय ३ रा
गीता स्वधर्माचरण निष्काम बुद्धिनें कर असें सांगते. तुमची वृत्ति पहा. स्वत:चे गुणधर्म पहा. तदनुरूप सेवा हाती घ्या. समाजसेवेचें कोणतेंहि कर्म हीन नाही. सारी कर्में पवित्रच. समाजसेवेचे सारे प्रकार सारखेच मोक्षदायी आहेत. वेद देणारा ऋषी असो वा रस्ता झाडणारा झाडूवाला असो, शाळेंत शिकविणारा शिक्षक असोवा दुकान घालणारा वाणी असो, सारे मोक्षाचे अधिकारी आहेत. कोणी कोणाला हिणवूं नये. माझे कर्म श्रेष्ठ असें म्हणूं नये. उपनिषदांत एक गोष्ट आहे. एकदा देवांचें भांडण लागलें. वारा म्हणे मी श्रेष्ठ. अग्नि म्हणे मी श्रेष्ठ. पर्जन्यदेव म्हणे मी श्रेष्ठ. इंद्र म्हणे मी श्रेष्ठ. असा त्यांचा वाद चालला असतां तेथे एकदम एक देवता येऊन उभी राहिली. ती ज्ञानदेवता उमा होती. दिव्यरूपानें ती झळकत होती. इंद्र वायूला म्हणाला “जा, त्या देवतेची विचारपूस करून ये.” वायु त्या देवतेजवळ आला व म्हणाला “ आपण कोण?” देवतेनें विचारलें “तुम्ही कोण?” वायु गर्वानें म्हणाला “ मी तुम्हांला माहीत नाही? अहो मी वायु. मी पर्वत उडवतों, झाडें मोडतों, समुद्र नाचवतों. माझी शक्ति अचाट आहे.” ती देवता म्हणाली “ही येथें एक काडी  आहे. ती उडवून दाखवा.” वायु ती काडी उडवूं लागला. काडी उडवतां येईना. तो खालीं मान घालून निघून गेला. नंतर अग्नि आला. त्यानें देवतेस विचारलें “तुम्ही कोण?” देवतेनें त्याला विचारिलें “आपण कोण?” अग्नि रागाने म्हणाला “ मी तुम्हांला माहीत नाहीं? मी अग्नि. मा मनांत आणीन तर सर्व ब्रम्हांडाचे भस्म करून टाकीन. माझा प्रभाव अनंत आहे.” देवता म्हणाली “ही येथे एक काडी आहे. ती जाळून दाखवा.” अग्नि आदळ आपट करूनहि ती काडी जाळूं शकला नाही. सारे देव या प्रकारें फजीत झाले. शेवटी ती ज्ञानरूपिणी म्हणाली “अरे देवांनो, मी मोठा मी मोठा, असें करीत भांडत काय बसतां? सूर्याच्या ठिकाणी प्रकाशण्याची शक्ति ठेवलेली आहे म्हणून तो मोठा. वायूच्या ठिकाणीं वाहण्याची शक्ति आहे. अग्नीच्या ठिकाणी जाळ्ण्याची शक्ति आहे. परंतु त्या त्या स्वत:च्या शक्तीचा गर्व नका करूं. त्या विश्वेश्वरानें ती ती शक्ति तुमच्या ठायी ठेवली आहे. तो ती शक्ति काढून घेईल तर तुम्ही कचरा आहांत.”

आपण आपापल्या गुणधर्माप्रमाणें सेवाकर्म करीत जावें. ती सारी कर्में मोक्ष देणारी आहेत. प्रभूला प्रिय आहेत. कर्में करावी. फलेच्छा सोडून करावी. परंतु फलेच्छा सोडून जरी कर्में केली तरी फळ मिळत नाहीं असें नाही. उलट, फलेच्छा मनांत सतत वागवून कर्म करणा-यापेक्षां निष्काम कर्मयोगी अनंतपट फळ मिळवितो. फळाचें चिंतन करीत बसण्यासहि त्याला वेळ नाही. तो वेळहि त्या कर्मांतच जात आहे. जो शेतकरी रात्रंदिवस शेतीच्या कामांत रंगला, त्याची शेती इतरांपेक्षा अधिक फलदायी झाल्याशिवाय राहणार नाही. निष्काम कर्म करणा-याची जीवनयात्रा नीट चालेल यांत शंका नाही. परंतु यापेक्षांहि अत्यंत महत्वाचीं अशी अनेक फळें तो मिळवतो.

गंगेच्या प्रवाहांत एक विज्ञानाचा अभिमान बाळगणारा स्नानार्थ गेला व एक भक्तिभावानें गेला, तर त्या दोघांची अंगशुद्धि होईलच. परंतु भक्तिभावानें स्नान करणा-यास अंगशुद्धिबरोबर इतर फळे मिळतात. विज्ञानवादी म्हणेल “गंगा म्हणजे काय?” ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे मिश्रण. जास्त काय आहे?” त्याला फक्त अंगशुद्धीचें फळ मिळेल. परंतु तें फळ एकाद्या हेल्यासहि मिळेल. पण भक्तिभावानें जो गेला, गंगा म्हणजे विष्णूच्या पदकमलापासून जन्मलेली, शंकराच्या जटाजूटांतून बाहेर आलेली, जिच्या तीरावर राजे राज्यें सोडून मोक्षाटी साधना करते झाले, जिच्या तीरावर योगीयोगाचरणांत रमले, ज्ञानी ज्ञानांत रंगले, भक्त भक्तीनें वेडे झाले, अशी ही गंगा, असें मनांत येऊन भावनांनी उचंबळून जो त्या गंगेच्या प्रवाहांत शिरला, त्याला अंगशुद्धीबरोबरच चित्तशुद्धिचेंहि फळ मिळतें. शरिराचे मळ त्याचे धुतले जातात, तसेच मनाचे मळहि धुतले जातात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel