न्यायमूर्ति रानड्यांना आंबा फार आवडे. एकदां कोणी तरी कलमी आंब्यांची भेट पाठवली. रमाबाईंनी सुरेख फांकी करून बशीत भरून त्यांच्यापुढें नेऊन टेवल्या. न्यायमूर्ति महत्त्वाच्या कामांत होते. तरीहि त्यांनी एकदोन फांकी घेतल्या. रमाबाईंना वाईट वाटलें. आपण एवढा आंबा कापून नेला परंतु न्यायमूर्तींनी दोनच फोडी खाल्ल्या हें पाहून त्या खट्टू झाल्या. पुढे न्यायमूर्तींनी काम संपल्यावर हंसत विचारलें “चेहरा कां उतरला? का. झालें?” रमाबाई म्हणाल्या “मेलं माणसानें मनापासून कांही आणून द्यावें परंतु तें घेऊहि नये का?” न्यायमूर्ति म्हणाले “अग आंबा आवडतो आवडतो म्हणून का मरेपर्यत आंबेच खात बसूं? तूं आणलास कापून म्हणून खाल्या दोन फोडी. खाण्यापिण्याच्या आनंदापेक्षां उच्चतर दुसरे आनंद आहेत. तिकडे मनाला वळवलें पाहिजे.” आपण पुष्कळसा वेळ या क्षुद्र गोष्टीच्या चर्चेत दवडतो. आपली शक्ति त्यांत दवडतो. आज काय काय खाल्लें, ते कसें होतें, याचीच चर्चा करतों. मिटक्या मारतों. खरें पाहिंले तर गोडी वस्तूंत नसून स्वत:मध्येंच आहे. जे येईल तें गोड करून घेता येईल. आईच्या हातचा कोंड्याचा मांडाहि गोड वाटतो. कारण आपल्या अंतरात्म्याची माधुरी आपण त्यांत ओततों. उपनिषदें म्हणतात “ हा आत्मा म्हमजेच रसानां रसतम:” आत्मा म्हणजेच माधुर्यसागर. आईला स्वत:चे मूल गोड वाटतें, कारण ती स्वत:च्या आत्म्याची माधुरी त्या मुलांत ओतते. त्या वैदिक मंत्रांत म्हटलें आहे ना:

“अंतर्हृदा मनसा पूयमान:
घृतस्य धारा अभिचाकषीमि”


आपलें भरलेलें हृदय, भरलेलें मन, म्हणजेच घृताची धारा. आईनें साधा भात वाढला तरी त्यांत सारी दुधें-तुपें येऊन जातात.

आपलें जीवन हेतुमय आहे. तें व्यर्थ दवडण्यासाठीं नाही. पुरूषार्थप्राप्ति करून घ्यावयाची आहे.

“मानवदेहाचे या साधनें
सच्चिदानंद पदवी घेणें”


या देहाच्या साधनानें परमेश्वर मिळवून घ्यावयाचा आहे. वायफळ गोष्टींत वेळ दवडूं नका. आहारविहारांत सर्वत्र प्रमाण राखूं या. सौंदर्य हें प्रमाणांत आहे. जीवन सुंदर करावयाचें असेल, तर सर्वत्र प्रमाण राखा.
कर्तव्याचरणांत खंड पडूं नये म्हणून शरीर सतेज निरोगी हवें मन प्रसन्न हवें. मन प्रसन्न राखण्यासाठी मधुनमधुन सृष्टीत अपरंपार सौंदर्य ओतून ठेवलें आहे. ती अमृतत्वाची जणुं ध्वजाच अशी उषा पहा सुंदर सूर्योदय पहा. सायंकाळची आकाशांतील रंगशोभा पहा. रात्रीचा चंद्रमा पहा. अनंत तारे पहा.

“पश्य देवस्य काव्यं व ममार न जीर्यति”

प्रभूचें हें अमर काव्य खालीं, वर सर्वत्र पसरलेलें आहे तें पहा. कधी उत्तुंग पर्वतावर जावें; कधी पवित्र नद्या पहाव्या; कधी प्रशांत वनांत बसावें; कधी उचंबळणारा अपरंपार सागर पहावा. सृष्टीच्या दर्शनानें मनाचा शीण जातो. स्वामी रामतीर्थ म्हणत असत “ कधी उदास वाटलें तर मी एकदम बाहेर पडत असे. तो वाहणारा वारा अंगाला लागतांच जणुं नवजीवन आल्यासारखें वाटे.” सृष्टीचा स्पर्श जीवनदायी असतो. मनस्ताप हरतो. जगांतील निंदा, अपमान, अपयश इत्यादींमुळें मनाला आलेली ग्लानि सृष्टिसौंदर्यानें नाहिशी होते. म्हणून भगवान् सांगून राहिले आहेत की, जरा नदीकांठी बस. पक्ष्यांची मधुर किलबिल चालली आहे, मोराचा पिसारा दिसतो आहे, हरणें उड्या मारीत आहेत, अशा जागी जरा बस. मनाला आराम मिळे. पुन्हां उत्साहानें कर्तव्य करावयास सिद्ध होशील.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel