अध्याय ८ वा
आपणांस जें ध्येय वाटलें, जो पवित्र विचार स्फुरला, जें नि:शंक असें ज्ञान वाटलें, त्याच्या प्रकाशात सतत पावलें टाकीत जाणें हा आपला परम धर्म होय. असें करीत असतां हा देह एक दिवस गळून पडेल. ज्या वेळेस मरणाचा क्षण येईल त्या वेळेस जीवनाचा परम विकास झालेला असूं दे. कसें मरावें हें या आठव्या अध्यायांत सांगितले आहे.

एकदां एकनाथांचा एक मनुष्य म्हणाला “नाथ, तुमचें जीवन किती सुंदर, किती प्रशांत ! आमच्या जीवनांत सदैव गोंधळ, कामक्रोध, द्वेषमत्सर यांचा सारखा गदारोळ ! आम्ही तुमच्यासारखें जीवन कसें जगूं? कोणती युक्ति? कोणता उपाय?” नाथ म्हणाले “तें सारें राहूं दे. परंतु तुला एक गोष्ट सांगतों. तुझें मरण जवळ आलें आहे. आठा दिशी तूं मरणार असें वाटतें.” तो मनुष्य घाबरला. तसाच घरीं आला. त्याला सारखें मरण दिसूं लागलें. आठा दिशी मरणार. अरेरे! आतां आठच दिवस! असें तो म्हणूं लागला. तो शेजा-यांकडे गेला व म्हणाला “मित्रांनो, मी भांडलों, त्याची क्षमा करा. आठ दिवसांनी मी मरणार.” तो पत्नीला म्हणाला “मी तुला उगीच छळलें. नाहीं नाही तें बोललों. तुझें हृदय शतदां दुखविलें. मला क्षमा कर. मी आतां मरणार.” त्यानें आपल्या मुलांना पोटाशीं धरलें. तो त्यांना म्हणाला “तुम्हांला मी उगीच मारलें, झोडपलें. बाळांनो, मी आतां जाणार. तुम्हांला प्रेमानें जवळ घेऊं दे.” गांवांत ज्याच्या ज्याच्याजवळ तो भांडला होता, ज्यांच्या ज्यांच्याजवळ द्वेषमत्सरानें झगडला होता, त्या सर्वांजवळ जाऊन त्यानें क्षमा मागितली. “झालें गेलें विसरा. मी मरणार आठा दिशी” असें म्हणून सर्वांना तो हात जोडी.

आठ दिवस झाले. नाथ त्या मनुष्याच्या घरी आले. तो मनुष्य नाथांच्या पायां पडून म्हणाला “आली का वेळ?” नाथ म्हणाले “ तें देवाला माहीत. परंतु तुझे हे आठ दिवस कसे गेले? कितीकांशी भांडलास? कितीजणांचा अपमान केलास?” तो म्हणाला “नाथ, कोठलें भांडण नि काय! सारखें मरण डोळ्यांसमोर दिसत होतें. सर्वांची क्षमा मागत होतों. झालें गेलें विसरून जा असें म्हणत होतों. भांडायला वेळच नाही.” नाथ म्हणाले “गड्या, आठ दिवस जी गोष्ट डोळ्यांसमोर ठेवून आम्ही वागत असतों. एक दिवस हा देह जायचा आहे. तेव्हां देहाचे गुलाम न होतां देवाचे गुलाम व्हावें. गोड बोलावें. सर्वांवर प्रेम करावें. जें जवळ असेल तें सर्वांस द्यावें. आपल्या या क्षणभंगुर जीवनानें दुस-यांच्या जीवनांत जर मंगल आनंद निर्माण करतां आला तर केवढी  बहारीची ती गोष्ट होईल !”

मरण म्हणजे जीवनाचें उत्तर. जीवन कसें जगलों हें मरणकाळच्या स्थितीवरून दिसून येतें. मरणकाळच्या एका क्षणांत सारें जीवन प्रतिबिंबित होत असतें. अत्तराच्या एका थेंबात ज्याप्रमाणें लाखों फुलांचा अर्क असतो त्याप्रमाणें मरणकाळच्या एका क्षणांत जीवनांतील आपल्या अनंत आचाराविचारांचे, अनंत कायिक, वाचिक व मानसिक कृतीचें सार साठलेलें असतें.   

आपण या जगात सारे दुकान घलून बसलों आहोंत. दुकानदार असतो, तो रोज रात्री त्या त्या दिवसाची शिल्लक काढीत असतो. दिसभर त्यानें शेंकडों उलाढाली केल्या. परंतु त्या सर्व उलाढालीचें सार इतका फायदा कीं इतका तोटा अशा सुटसुटित उत्तरांत निघतें. तो रोजचा जमाखर्च पाहतो. महिन्याचा पाहतो. वर्षअखेर इतका तोटा किंवा इतका इतका नफा असें म्हणतो. बारा वर्षें समजा दुकान चाललें. बारा वर्षांत इतकें कमावलें किंवा इतकें गमावलें असें एकाक्षरी उत्तर तो काढतो. बारा वर्षांतील त्याच्या अपरंपार उलाढालीचें एवढें मिळविलें किंवा इतकें घालविलें एवढेंच सार निघतें.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel