''परंतु इकडचं सरकारी वातावरण गरम होईल. इकडे लक्ष ठेवा. तुम्ही त्या शिक्षकांना जरा समज द्या. अहो, संस्थेचं हित आधी पाहिलं पाहिजे. अशा वेळेस कठोर व्हावं लागतं.'' मामलेदार पोक्तपणे बोलले.
''बरं, मी विचार करतो. आपला आभारी आहे. येतो मी.'' असे म्हणून गणपतराव उठले.
''बसा ना हो. चहा घेता का? ललित, अरे ललित !'' त्यांनी हाक मारली.
''काय बाबा?'' ललितने विचारले.
''अरे, हे तुझे मास्तर आले आहेत. नमस्कार कर त्यांना. चहा आण ना !'' साहेबांनी लाडिकपणे सांगितले.
''मी चहा घेत नाही आणि दुधानं मला मळमळतं. खरंच सांगतो.'' गणपतराव काकुळतीने म्हणाले.
''बरं ही सुपारी घ्या. लवंग-वेलची घ्या.'' मामलेदार म्हणाले.
गणपतराव नमस्कार करून उठले. ते घरी आले. त्यांना अत्यंत वाईट वाटत होते. संस्थेचे खरे हित कशात? नावाची दगडी संस्था टिकविण्यात काय अर्थ? मुकुंदरावांना कोणत्या तोंडाने सांगायचे? शेवटी ते त्यांना काहीच बोलले नाहीत.
परंतु काही दिवसांनी शिक्षणाधिकार्यांकडून एक लिफाफा आला. त्यात स्वच्छ हुकूमच होता की, ''मुकुंदरावांना ताबडतोब काढून टाका.' गणपतरावांच्या हातातून ते पाकीट खाली गळले. काय करावे त्यांना सुचेना. शेवटी त्यांनी मुकुंदरावांना बोलावणे पाठवले. मुकुंदराव आले. गणपतरावांनी तो लिफाफा त्यांच्या हाती दिला.
मुकुंदराव शांतपणे म्हणाले,''तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. मला याची स्वप्नं पडू लागलीच होती. दोन देवतांची सेवा करता येत नसते. मला देशाची सेवा करायची असेल तर मोकळंच झालं पाहिजे. मुलांच्या मनात बी पेरता येईल असं वाटून येथे आलो. परंतु नाही त्याची इच्छा. ठीक. तुम्ही मला उदारपणानं वागवलंत, प्रेम दिलंत, याबद्दल मी आभारी आहे.''
मुकुंदराव वर्गावर गेले. शाळेतील आजचा शेवटचा तास होता. परंतु नित्याप्रमाणे ते बोलत होते. त्यांनी काही सांगितलं नाही. भरलेलं हृदय ते आतल्या आत दाबून ठेवीत होते. परंतु मुलांत कुणकुण पसरली होती.
शांतीने विचारले,''तुम्ही शाळा सोडून का जाणार?''
''कोणी सांगितलं तुला? कोण म्हणतो मी जाणार म्हणून?'' मुकुंदरावांनी हसत विचारले.