शांता विचारते, ''भाऊ, माझी वैनी कधी येणार?'' मी हसतो व सांगतो, ''काही येणार नाही वैनी, तुझा भाऊ आता संन्यासी होणार.'' माया, होऊ का ग संन्यासी? नको, पण उगीच तू रडत बसशील. मला आत लोक काय म्हणतात माहीत आहे का? तुझ्या रामदासाला 'दीनबंधू' हे नाव मिळालं आहे. माया, दीनबंधूची बायको व्हायला तयार आहेस का? मी आता लक्षाधीश नाही. मी गरीब झालो आहे. सारं देऊन टाकलं. बाबांची संपत्ती गरिबांना दिली. माझी संपत्ती तुला दिली. आता माझ्याजवळ काय आहे शिल्लक? म्हटलं तर सारं आहे. म्हटलं तर काही नाही.

माझा दिलरुबा हल्ली नीट वाजत नाही. त्याच्या तारा बांधायला लौकर ये. तू तेथे काय करतेस, कसा दवडतेस वेळ? माझे फोटो घेऊन ये. मळवीत असशील, अश्रूंनी त्यांची पूजा करीत असशील, होय ना? उद्या मला घेऊन अशी नको हो बसू. मला मोकळं सोड. मुकुंदरावांबरोबर मी सर्वत्र हिंडलो; तुझ्या रामदासाचं केवढं टोलेजंग स्वागत,केवढाल्या मिरवणुका ! हे स्वागत कशासाठी? मी गरिबांसाठी मरावं म्हणून माया, हे जीवन शेवटी जगातील दुःख दूर करण्यात, जगातील अन्याय दूर करण्यात, कामी आलं पाहिजे. फूल फुलवून देवाच्या चरणी वाहावयाचं. संसारात पवित्र व शांत होत होत शेवटी दरिद्रीनारायणाचे चरणी प्राण अर्पावयाचे.

तू दिलेली शाल प्रवासात मळली होती. काल ती मी धूत होतो. आता स्वच्छ करून तिची घडी घालून ठेवली आहे. तुमच्या गावी येईन तेव्हा ती अंगावर घेईन.

तू फिरावयाला जातेस की नाही? बाबूंच्या जंगलात जातेस की नाही? बांबूतील संगीत ऐकून माझा दिलरुबा आठवतो की नाही? सांभाळ हो, बंगालमध्ये सर्प फार. जाशील जंगलात, चावेल साप. जाशील जंगलात व खाईल वाघ. जंगलात एकटं जाऊ नये. बरोबर रामदास असेल तरच मजा.

हल्ली उन्हाळा फारच होतो. परंतु त्यामुळेच पावसाळा लवकर येईल हेही खरं. रखरखीत तापलेली भूमी पावसाची उत्कंठेनं वाट पाहात आहे. आपले कढत सुस्कारे वर पाठवीत आहे. मधून मधून अभ्रं येऊ लागली आहेत. पृथ्वीला आशेचा संदेश देऊन ती पांढरी अभ्रं पुन्हा निघून जातात, दूर दूर निघून जातात.

माया, तुझं घर तुझी वाट पाहात आहे. त्या घरात मी एकटा कसा जाऊ? त्या घरात एकदम तू व मी शिरू. केव्हा येऊ ते कळव. लवकर कळव. सर्वांना सप्रेम प्रणाम.

- तुझा रामदास.

मायेने वडिलांजवळ बोलणे काढले. रमेशबाबांच्या मनात तसेच विचार खेळत होते. मायेचे आता लग्न केले पाहिजे हे त्यांनी ओळखले. वेळीच सारे झाले म्हणजे गोड असते. उगीच लांबवण्यात काय अर्थ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel