शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या सिंहगर्जनेने इतर तत्त्वज्ञाने पळून गेली असे म्हणतात. सिंह पाहताच कोल्ही: कुत्रीच नव्हे, तर प्रचंड हत्तींचीही तारांबळ उडते. शंकराचार्यांच्या अद्वैतामुळे द्वैतवादी पळाले, परंतु समाजातील द्वैत पळाले नाही! समाजातील दंभ, आलस्य, अज्ञान, रूढी, भेदभाव, उच्च-नीचपणा, स्पृश्यास्पृश्ये, वैषम्ये, दारिद्र्य, दैन्य, दास्य, दुबळेपणा भ्याडपणा या गोष्टी पळाल्या नाहीत. ही सारी द्वैताची प्रजा आहे. समाजात दुजाभाव असला म्हणजे हे सारे भीषण चित्र दृष्टीस पडू लागते. भारतीय समाजात तोंडातील अद्वैत समाजातील रोजच्या आचारात अल्पस्वल्पही जरी दाखविण्यासाठी कोणी मनापासून झटते, तर भारताला अशी अधोगती येती ना.

थोर स्वामी विवेकानंद म्हणूनच खेदाने म्हणत की, “हिंदुधर्माइतकी तत्त्वे सांगणारा दुसरा धर्म नाही, आणि हिंदू लोकांइतके प्रत्यक्ष आचारात अनुदार लोकही अन्यत्र सापडणार नाहीत!”

शेकडो वर्षे अद्वैताचे डंके वाजत आहेत. परंतु रानातील रानटी लोकांजवळ आमचे मठ सोडून आम्ही कधी गेलो नाही. कातकरी, भिल्ल, गोंड-शेकडो जाती; त्यांच्यापासून अहंकाराने आम्ही दूर राहिलो. अद्वैतावर भाष्ये लिहिणारे व ती वाचणारे प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारात अद्वैतशून्य दृष्टीने जणू वागत.

अद्वैत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. या तत्त्वाचा उत्तरोत्तर जीवनात अधिक अधिक अनुभव घेत जाणे म्हणजेच भारतीय संस्कृतीत भर घालणे होय. आपल्या सर्व आंतरबाह्य कृतींतून अद्वैताचा सुगंध जसजसा येऊ लागेल, तसतसा भारतीय संस्कृतीचा आत्मा आपणांस समजू लागेल असे म्हणता येईल. तोपर्यंत त्या संस्कृतीचे नावही उच्चारणे म्हणजे त्या थोर कृषींची व त्या थोर संतांची केवळ विटंबना आहे, दुसरे काय?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel