हृदयातील ही वेणू एखाद्या वेळेस ऐकू येते. परंतु हा वेणुनाद अखंड ऐकावयास आला पाहिजे. इतर आवाज बंद केल्याशिवाय हा अंतर्नाद ऐकावयास मिळणार नाही. इतर वासनांची गीते बंद केल्याशिवाय ध्येयगीत कसे ऐकू येणार ? वरचे दगडधोंडे दूर केले की खालचा झुळूझुळू वाहणारा झरा दृष्टीस पडतो. त्याचप्रमाणे अहंकार, आसक्ती, राग, द्वेष यांचे फत्तर फोडून दूर केले म्हणजे हृदयातील भावगंगेचे गुणगुणणे ऐकू येईल. कामक्रोधांचे ताशे बंद करा. म्हणजे हृदयातल्या शिवालयातील मुरली ऐकू येईल.

हरिजनांबद्दलच्या उपवासाच्या वेळी महात्माजींनी आश्रमातील बाळगोपाळांस लिहिलेल्या पत्रात म्हटले होते :
"चाळीस वर्षांच्या सेवेने माझ्या अंत:करणात मी थोडी व्यवस्था निर्माण केली आहे. संयमाने, तपस्येने मी जीवनातील बेसूरपणा दूर केला आहे, म्हणून तो आतील मंजुळ ध्वनी मी ऐकू शकतो.'

सेवेने, संयमाने हे संगीत निर्माण करावयाचे आहे. कृष्ण म्हणजे मूर्त संयम-कृष्ण कर्षून घेणारा, अर्जुनाचे घोडे संयमात राखणारा, इंद्रियांचे घोडे स्वैर जाऊ न देणारा म्हणजे कृष्ण. संयमाशिवाय संगीत नाही. संगीत म्हणजे मेळ; प्रमाण. प्रमाण म्हणजे सौंदर्य. जीवनात सर्व गोष्टींचे प्रमाण साधणे म्हणजेच संगीत निर्माण करणे. हाच योग.

यासाठी धडपड हवी. रात्रंदिवस प्रयत्न हवा. ती अत्यंत गोड मुरली ऐकण्याचे भाग्य पाहिजे असेल, तर रात्रंदिवस अविश्रान्त प्रयत्न हवेत, दक्षता हवी.
रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन । ।


रात्रंदिवस जनात व मनात पदोपदी झगडे होतील. पुन:पुन्हा पडू परंतु पुन:पुन्हा चढू. धडपड हेच मानवाचे भाग्य आहे. पशूच्या जीवनात धडपड नाही. आजच्यापेक्षा उद्या पुढे जाऊ, आजच्यापेक्षा उद्या अधिक पवित्र होऊ ही भावना त्याच्याजवळ नाही. जो मुक्त झाला, त्याला ही धडपड नाही. ज्याच्या जीवनात धडपड नाही तो मुक्त तरी असेल, किंवा पशू तरी असेल.

धडपड हे आपले ध्येय. आपण सारी धडपडणारी मुले. 'इन्किलाब जिंदाबाद' याचा अर्थ 'क्रांती चिरायू होवो !' असा आहे. धडपड चिरायू होवो. उत्तरोत्तर विकास होवो. धडपड करता करता एक दिवस परमपद गाठू.
याचसाठीं कला होता अट्टाहास
शेवटचा दीस गोड व्हावा । ।


हा सर्व अट्टहास, ही सारी धडपड, तो शेवटचा दिवस गोड यावा म्हणून आहे. तो गोड वेणुध्वनी कानी पडावा म्हणून आहे. तो दिवस शतजन्मांनी आला, तरी लवकरच आला असे म्हटले पाहिजे.

फ्रान्समधील विख्यात कथालेखक अनातोले याने एके ठिकाणी लिहिलं आहे : दैवाने 'तुझे काय करू' असे जर मला विचारले, तर मी त्याला म्हणेन, 'माझे सारे काही दूर कर, परंतु माझी धडपड दूर करू नकोस. माझे दु:ख दूर करू नकोस.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel