दिव्याच्या काचेला आतील ज्योतीमुळे महत्व आहे. त्या ज्योतीचे उपासक आपण झाले पाहिजे. जोपर्यत आत्म्याचे मोठेपणा कळत नाही तोपर्यत खरे प्रेम नाही. पत्नीच्या आत्म्याच्या मोठेपणा दिसू लागताच पती तिला ज्ञान देईल. ध्येय देईल. तिला केवळ वस्त्रलंकारांनी बाहुलीप्रमाणे नटवीत बसणार नाही. त्याप्रमाणेच ज्या दिवशी पतीमधील दिव्यता पत्नीस दिसेल, त्या दिवशी ती पतीला वाटेल तसे वागू देणार नाही, वाटेल त्या मार्गाने पैसे मिळविण्याचे काम करू देणार नाही.

गृहस्थाश्रमात याप्रमाणे पावित्र्य आणावयाचे. एकमेकांनी एकमेकांस सावध करीत कधी प्रेमाने, कधी रागाने संबोधीत वर वर जावयाचे. पतिपत्नींनी शेवटी बहीणभावाप्रमाणे व्हावयाचे. आसक्तिमय प्रेमातून शेवटी अनासक्त प्रेम निर्माण करावयाचेय. चिखलातून कमळे फुलवावयाची. संसारातच मोक्षश्री आणावयाची.

भारतीय संस्कृतीतील गृहस्थाश्रम हा मोक्षाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. ही पायरी आहे. तेथेच कायमचे राहावयाचे नाही. गृहस्थाश्रमात राहून संतती निर्माण करून, वासनाविकार शांत करून, नाना प्रकारचे त्यागाचे धडे शिकत शिकत, शेवटी या छोट्या संसारातून एक दिवस मोठ्या संसारात जावयाचे आहे. ही गोष्ट पतिपत्नींना विसरता कामा नये.

गृहस्थाश्रम ! हाही एक आश्रमच आहे. आश्रमाचेच पावित्र्य येथेही पाहिजे पतिपत्नी, मुलेबाळे यांचा हा आश्रम आहे. सर्वांनी सहकार्य करावयाचे, प्रेमाने नांदावयाचे. ध्येयाची पूजा करावयाची. कुलपरंपरा म्हणून काही असते. त्या कुलपरंपरेला मरू न देणे हे काम असते. रघुवंशात राम सीतेला विमानातून खालची स्थळे दाखवीत आहेत असा एक भाग आहे, एका तपोवनाकडे बोट करून राम म्हणतात, ''येथे एक आदर्श ऋषी राहत असत. आल्यागेल्याचे ते मनापासून आदरतिथ्य करीत परंतु त्या ऋषीला मूलबाळ नव्हते. तो ऋषी निवर्तला. परंतु त्या ऋषीचे आदरतिथ्य व्रत तपोवनातील हे वृक्ष करीत असतात. जो कोणी येईल त्याला फुलेफळे, छाया देतात. ''

अशा रीतीने कुळाची परंपरा चालवावयाची असते. माझ्या कुळात कोणी खोटे बोलणार नाही, माझ्या कुळात कोणी चोरी करणार नाही, अतिथीला नकार मिळणार नाही अशा प्रकारची विशिष्ट प्रथा त्या त्या कुळात असते.

त्या त्या कुळपरंपरेसाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागला, तरी तो करावयाचा असतो. हरिश्चंद्र सर्वस्वास मुकला. श्रियाळ-चांगुणा यांनी मुलगा अर्पण केला. कुटुबांत जणू एक देव. त्याच्यासाठी कुटुबांत सर्व मंडळी सिध्द असत. हरिश्चंद्र निघताच तारामती त्याच्या पाठोपाठ जाते. हरिश्चंद्र तारामती यांच्या पाठोपाठ चिमणा रोहिदास धावत जातो. त्या रोहिदासास मायबाप नको म्हणत नाहीत. ''तू लहान आहेत, कशाला हालात येतोस? '' असे म्हणत नाहीत. स्वत:च्या तालमीत आपल्या मुलालाही त्यांना तयार करावयाचे असते. ध्येयपूजा स्वत:च्या उदाहरणाने आपल्या मुलाबाळांना त्यांना शिकवावयाचे असते.

असे गृहस्थाश्रम आज कोठे आहेत?  पती तुरुंगात जाताच पत्नी पाठोपाठ निघत नाही. पत्नी निघताच पती निघत नाही. आईबाप जाताच मुले धावत नाहीत. मुले जाताच आईबाप प्रेमाने त्यांच्या मागे लागत नाहीत. एका ध्येयाची पूजा नाही. ध्येयेच विचित्र असतील तर गोष्ट निराळी. परंतु आसक्ती व भीती आड येत असतील तर मात्र हे वाईट आहे.

याचे कारण काय? याचे कारण ज्ञानचर्चा नाही. पती जे ऐकतो ते पत्नीला सांगणार नाही. राष्ट्रात जे विचार उत्पन्न झाले आहेत त्यांची घरात उजळणी होणार नाही. पती हा पत्नीचा गुरु. मुलीचे मौंजीबंधन बंद झाले. पती हाच गुरु असे ठरले. परंतु हा पती गुरुचे काम करतो का? ज्ञानदान, विचारदान करतो का? आजूबाजूच्या जगाचे ज्ञान पत्नीला करून देतो का?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel