संयम

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार नाही.

भारतीय संस्कृतीचा संयम हा एकप्रकारे आत्मा आहे, असे म्हटले तरी चालेल. भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे. आपण शंकराच्या देवळात जातो ; परंतु आधी बाहेर कासवाची मूर्ती असते. या कासवाचे दर्शन घेतल्याशिवाय शिवाकडे, मृत्युंजयाकडे जाता येणार नाही. आणि कासव म्हणजे काय ? कासव म्हणजे संयमाची मूर्ती. कासव आपले सारे अवयव क्षणात आत घेते. क्षणात बाहेर काढते. स्वतःच्या विकासास अवसर असेल तर सारे अवयव बाहेर आहेत ; स्वतःला धोका असेल, तर सारे अवयव आत आहेत. असे हे कासव भारतीय संस्कृतीने गुरुस्थानी मानिले आहे. देवाकडे जावयाचे असेल तर कासवाप्रमाणे होऊन जा. कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांचे स्वामी व्हा. वाटेल तेव्हा इंद्रिये स्वाधीन राखता आली पाहिजेत. ज्याला जगाचे स्वामी व्हावयाचे असेल, त्याने आधी स्वतःचे स्वामी झाले पाहिजे. ज्याला देव आपलासा करून घ्यावयाचा आहे, त्याने स्वतःचे मन आधी आपल्या ताब्यात घ्यावयास पाहिजे.

शंकराची मूर्ती डोळ्यांसमोर आणा. शंकराला तिसरा डोळा आहे. दोन डोळ्यामध्ये हा तृतीय नेत्र आहे. या तृतीय नेत्राचे काय काम ? या तृतीय नेत्राचे काम पहारेक-याचे आहे. डोळ्यांवर, कानांवर, जिभेवर, सर्व इंद्रियांवर या डोळ्याची दृष्टी आहे. या तृतीय नेत्रात अग्नी आहे. माझ्या जीवनाच्या विकासाला जे जे विरोधी असेल, त्याचे त्याचे भस्म करावयास हा अग्नी सिद्ध आहे. हा तिसरा डोळा उघडा ठेवल्याशिवाय जीवनात सिद्धी नाही.

माझ्या डोळ्यांनी वाटेल तेथे नाही पाहता कामा, कानांनी वाटेल ते नाही ऐकता कामा, जिभेने वाटेल ते नाही बोलता कामा, नाही खाता कामा. हातांनी वाटेल ते नाही करता कामा, पायांनी वाटेल तेथे नाही जाता कामा. माझ्या ध्येयाला अनुकूल असणा-या गोष्टींकडेच माझी इंद्रिये गेली पाहिजेत. या इंद्रियबैलांनी माझा जीवनरथ खड्ड्यात न घालता माझ्या प्राप्तव्यस्थानी नेला पाहिजे.

ज्ञानेश्वरीमध्ये योगाचे वर्णन करताना फारच सुंदर ओव्या लिहिल्या आहेत. गीतेमध्ये जो-

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।।


हा श्लोक आहे. त्या श्लोकावरच्या त्या ओव्या आहेत. ज्याला कर्मयोग साधावयाचा आहे, त्याने हा संयमयोग अंगी आणणे आवश्यक आहे.

नियम पाळावे। जरि म्हणसी योगी व्हावे।।

योगी म्हणजे कर्मयोगी. सतत कर्मात रंगून जाणे. सारखी सेवा हातून होणे. यासाठी काय केले पाहिजे ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel