पत्नी म्हणते, “घरात काही करा; परंतु जगात नीट वागा. आणा सारी घाण घरात. ती काढायला मी समर्थ आहे. ओरडा माझ्यावर, रागवा माझ्यावर. तुमचा कामक्रोध होऊ दे शांत. पशुत्व माझ्या ठायी होमा. तुमचे पशुत्व होमण्याची मी पवित्र वेदी आहे. बाहेर जाल ते माणूस होऊन जा, पशूपती होऊन जा, शिव होऊन जा.” सत्स्वरूपी पतीला शिवशंकर करणारी स्त्री ही शक्ती आहे. पत्नी पतीला माणसाळविते, शांत करते, स्थिर करते, आळा घालते, संयम घालते, मर्यादा घालते.

परंतु हे सारे करावयास पत्नीच्या प्रेमात शक्तीही हवी. तिचे प्रेम दुबळे असता कामा नये. तिची सेवा शक्तिहीन असता कामा नये. एक प्रकारचे तेज व प्रखरता त्या प्रेमातही हवी. धीरोदात्तता हवी. मुळूमुळू रडणे म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम रडत नाही बसत. प्रेम कर्तव्य करावयाला पदर बांधते पती दारू पितो, नाही मी पिऊ देणार. पती सिगरेट ओढतो, नाही मी ओढू देणार. हे मुखकमल त्या घाणेरड्या धुराने भरवायचे? ते सुंदर ओठ काळेकुट्ट करावयाचे? विडा खाऊन सारख्या पिचका-या मारतात, नाही मी घाण करू देणार. पती म्हणजे माझे ठेवणे. मी ते सांभाळीन. मलिन होऊ देणार नाही. पतीला निर्मळ ठेवण्यासाठी मला मरावे लागले तरी चालेल. पतीच्या व्यसनात मी त्याला साहाय्य नाही करणार. मी आड उभी राहीन. मी जिवंत असताना पतीकडे व्यसन कसे येईल? माझ्या जीवनाचे सुदर्शन मी आड घालून ठेवीन.

भारतीय संस्कृतीत मांडव्य ऋषीला त्याची पत्नी वेश्येकडे घेऊन जाते. अशी कथा आहे. आदर्शाची ही पराकाष्ठा होय! ह्या त्यागाची व धैर्याची कल्पना करवत नाही. पतीची इच्छा म्हणजे माझी इच्छा. त्याने शेण मागितले तरी निरहंकारपणे शेण देईन. माझे हात म्हणजे पतीचे हात. माझ्या हातून त्याला पाहिजे ते तो घेईल. माझे हात तदर्थ आहेत. मी केवळ एक किंकरी!

परंतु ह्या आदर्शाची मला कल्पना करवत नाही. भारतीय सतींचा आदर्श दुबळा नसावा असे मला वाटते. वरच्या उदाहरणातील आदर्श दुबळा आहे असे माझ्याने म्हणवत नाही. पतीबरोबर चढेन किंवा पडेन, जेथे पती तेथे मी, जेथे त्याची इच्छा तेथे मी. ह्या आदर्शासमोर माझे मिटून जातात; मला घेरी येते!

सुधारणा करण्याचे अनेक मार्ग असतात. त्यांतील हाही एक असू शकेल. परंतु हा दुस्तर आहे. भारतीय स्त्रीचा हा सर्वमान्य आदर्श होऊ शकणार नाही. भारतीय स्त्रीयांचा आदर्श आज दुबळा झाला आहे! तो प्रखर व्हावा एवढेच मला म्हणावेसे वाटते. घटस्फोटाचा कायदा झाला तर मी त्याला नावे ठेवणार नाही. परंतु प्रेम, त्याग, सहकार्य, सुधारणा या शब्दांना काही अर्थ उरावा असे जर वाटत असेल, तर पतीपत्नींनी एकमेकांचा कालत्रयी, कोणत्याही परिस्थितीत त्याग करणे हेच मला श्रेयस्कर वाटते. यातच माणुसकी आहे. यात माणसाची दिव्यता आहे.

भारतीय स्त्रीयांच्या व्रतातील दुबळेपणा जाऊन प्रखरपणा यावा, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेम-वृत्तीत विशालता यावी. स्त्रियांचे प्रेम खोल असते, परंतु लांबरुंद नसते. त्यांच्या दृष्टीची मर्यादा फारच संकुचित आसते. कुटुंबापलीकडे त्यांचे फारसे लक्ष नसते; आणि यामुळेच स्त्रिया भांडणाला कारण, असे कुटुंबात म्हणतात. स्त्रियांचे क्षितीज मोठे झाले पाहिजे. आजूबाजूच्या जगाचा विचार त्यांना असला पाहिजे. जगातील सुखदु:खाची कल्पना त्यांना हवी. भेदभाव कमी करायला हवा. पती आपली मुलेबाळे यांच्यापलीकडे जग नाही, असे त्यांना वाटता कामा नये.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel