अद्वैताचा मंत्र जपत जीवनात संगीत आणणारे आपले पूर्वज होते. हिंदु-मुसलमानांतही ते आशेने ऐक्य आणीत होते. हिंदूंच्या देवस्थानांना मुसलमानी राजांनी देणग्या दिल्या व मुसलमानी पीरांना हिंदू राजांनी वतने दिली. हिंदू राजे मोहरम साजरा करीत व हिंदू उत्सवांत मुसलमानही येत. अमळनेरच्या सखाराम-महाराजांच्या रथाला पहिली मोगरी देण्याचा मान मुसलमानांचा आहे! आणि त्यांना नारळ प्रसाद म्हणून देण्यात येतो! हिंदूंच्या रथाला मुसलमान बंधूंनी मोगरी पहिल्याने द्यायची! आजच्या काळात हा मूर्खपणा व स्वाभिमानशून्यपणा समजला जाईल. परंतु पूर्वजांची दृष्टी फार थोर होती. भारतात आलेल्या सर्वांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण करणे हे त्यांचे पारंपारिक पवित्र कर्तव्य होते. आस्तिकाने पेटविलेला तो नंदादीप त्यांना विझवावयाचा नव्हता. मुसलमानांच्या मोहरमात हिंदूही सामील होत. हिंदू जमीनदारांच्या घरी ताबूत यावयाचे. मुसलमानांस नारळ व गूळ देण्यात यावयाचा. आमच्या लहानपणी आमच्या गावात हे प्रेमळ संबंध मी पाहिले आहेत. गरीब मुसलमान मुले आमच्याजवळ कागद मागावयास येत व आम्ही त्यांना ते देत असू. माझ्या शेजारच्या बंधूंचा होऊ दे चांगला डोला!

हिंदूंच्या उत्सवाला मुसलमानांस बोलाविले तर ते येतात. माझ्या एका मित्राजवळ एक मुसलमान मुलगा प्रेमाने गणपति-अथर्वशीर्ष शिकला. माझ्या एका अंमळनेरच्या मित्राकडे दत्तजयंतीला मुसलमान मित्र आले होते.

आपल्यापेक्षा आपले पूर्वज अधिक समाजशास्त्रज्ञ होते. आपण आज साम्राज्यवादी परसत्तेचे गुलाम झालो आहोत. परकीय लोक आपल्यात भेद पाडीत आहेत. आपणही भेद पाडीत आहोत. भेद पाडून गुलामगिरी लादणा-या सरकारला आपण साहाय्यभूत होत आहोत. भेदांवर अभेद हेच औषध आहे. विषावर अमृताचा उपाय; दुसरा चालणार नाही.

पूर्वजांचे प्रयोग आपण पुढे नेऊ या. अद्वैत अधिक साक्षात्कारू या. भरतभूमीत ऐक्य निर्मून मग जगाला आपण हाक मारू. ही भरतभूमी मानवजातीचे तीर्थक्षेत्र होईल. सारे धर्म, भिन्न भिन्न संस्कृती, येथे एकत्र नांदत आहोत हे ऐकून सर्व देश भरतभूमीच्या पायांपाशी येतील! दे ईश्वरदत्त महान कार्य आपणास साधावयाचे आहे! हे महान ध्येय आपणास बोलावीत आहे. या महान ध्येयासाठी बाकी सारी क्षुद्रता आपण झडझडून फेकून दिली पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या उपासकांनी श्रद्धेने त्यागपूर्वक यासाठी उठले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel