काँग्रेसची संघटना असो, मजुरांची संघटना असो, शेतकरीसंघ असोत, युवकसंघ असोत, ग्रामोद्योग असोत, प्रचंड कारखाने असोत, व्यायामशाळा काढा व औद्योगिक केंद्र उघडा; ही सारी सेवेची कार्मे असतील, तर ती मंदिरे आहेत. तेथे सर्वत्र विठ्ठल आहे.

ती कर्मे करताना सुख मिळो वा दुःख मिळो, तेहि विठ्ठलाचेच रूप. ती कर्मे करताना गळ्याला फास लागो वा फुलांचा हार गळ्यात पडो, दोन्ही सारखीच. मनाची चलबिचल नाही. भक्तिच्या प्रकाशात सारे सुंदर व सारे मंगलच आहे.

महात्माजींना एकदा एकाने प्रश्न विचारला, “तुमच्यावर इतक्या टीका होतात, तुम्हाला काय वाटते ?” तो महापुरुष म्हणाला, “माझ्या अंतरंगी तंबोरा लागलेला असतो.” महात्माजींच्या हृदयात अखंड संगीत आहे. तेथे प्रक्षुब्धता नाही. सागरावर अनंत लाटा उसळतात. परंतु आत खाली समु्द्र गंभीर असतो. तेथे प्रशान्त शान्ती असते.

महापुरुषांना हे कसे शक्य होते ? कारण स्वार्थाचा लवलेशही तेथे नसतो. जनतेची सेवा हेच एक ध्येय असते. आपण समुद्रात बुड्या मारतो, त्या वेळेस कितीतरी घनफूट पाणी आपल्या डोक्यावर असते. परंतु त्या पाण्याचा बोजा वाटत नाही. आपण पुनःपुन्हा बुड्या मारतो. पाण्यात लपतो, खेळतो, ठाव आणतो. परंतु त्या पाण्यातून बाहेर या. स्वतःसाठी एक घागर भरून घ्या. ती घागर तुमच्या डोक्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या डोक्याला, तुमच्या कमरेला तिचे ओझे झाल्याशिवाय राहणार नाही.

स्वतःच्या केवळ सुखासाठी केलेले प्रत्येक स्वार्थी कर्म म्हणजे बोजा आहे. त्याचे जिवाला ओझे होते. तो जोजारा होतो. परंतु हे कर्म जनतेसाठी आहे असे म्हणा, म्हणजे ओझे नाही. जनसागरात बुडा; तुमच्या स्वतःचा बिंदू जनतासिंधूत मिसळून टाका. म्हणजे मग जीवनात संगीत आल्याशिवाय राहणार नाही.

“शान्ताकारं भुजगशयनम्” असे परमेश्वराचे वर्णन केलेले आहे. परमेश्वर सहस्रफणांच्या शेषावर निजला आहे. परंतु शांतपणे पहुडला आहे याचा अर्थ काय ? परमेश्वर कोट्यवधी कर्मे करीत आहे. आपण झोपलो तरी देव झोपत नाही. तो मेघ पाठवीत असतो, तारे हसवीत असतो, कळ्या फुलवीत असतो. परमेश्वर झोपून विश्व कसे चालेल ?

या विश्वाचा पसारा मांडणा-या परमेश्वराला किती शिव्याशाप मिळत असतील ! या जगात सर्वांत मोठा हुतात्मा कोणी असेल, तर तो परमेश्वर हा होय. परंतु तो परमेश्वर शिव्याशापांकडे लक्ष देत नाही. त्याला जे योग्य व परिणामी हिताचे वाटते ते तो करीतच आहे. शांतपणे, अविरत करीत आहे.

परमेश्वराचे हे वर्णन महापुरुषाला लागू पडते. महापुरुषही असेच शांतपणे ध्येयावर दृष्टी ठेवून पुढे जात असतात. त्यांची नितान्त निःस्वार्थता त्यांना अपार धैर्य व शांती देत असते. स्वार्थाला भय आहे, निःस्वार्थी वृत्तीला भय नाही.

एकच कर्म नेहमी करावे लागेल असे नाही. कधीकधी नेहमीची वर्णकर्मे दूर ठेवून इतर कर्मेही अंगीकारावी लागतील. आग लागली असता सर्वांनी धावले पाहिजे. भूकंप झाला असता सर्वांनी स्वयंसेवक झाले पाहिजे. बिहारमध्ये भूकंप झाला होता. धावले जवाहरलाल. तेथे स्वयंसेवक भेदरून उभे होते. मातीतून मुडदे काढण्याचे धैर्य त्यांना होईना. जवाहरलालांनी हात सरसावले ! घेतले कुदळफावडे, लागले उकरायला ! त्याबरोबर सारे स्वयंसेवक संस्फूर्त झाले. प्रसंगी कोणतेही कर्म येवो, त्या कर्मात तितक्याच तडफेने, तितक्याच तन्मयतेने पडले पाहिजे.

आज भारतवर्ष दास्यात आहे. या पतित राष्ट्रास मुक्त करणे हा आज सर्वांचा मुख्य धर्म आहे. आपापल्या आवडीनिवडी क्षणभर बाजूस ठेवाव्या लागतील आणि स्वातंत्र्याच्या कोठल्या ना कोठल्या कर्मात रमावे लागेल. लोकमान्यांनी वेद-वेदान्ताचा, गणित-ज्योतिषाचा आनंद सोडला, हा त्यांचा सर्वात मोठा त्याग होय. नामदार गोखल्यांना अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहावयाचा होता, न्यायमूर्तीचे चरित्र लिहावयाचे होते ; परंतु हे सारे त्यांना दूर ठेवावे लागले. प्रफुल्लचंद्रांना शास्त्र आवडते ; परंतु बंगाली खेड्यांत म्हातारपणी चरखा देत ते हिंडतात. राष्ट्र ज्या ज्या योगे बलवान होईल, ते ते कर्म आज हातात घ्या. राष्ट्रोद्धाराचे जे अनेक उद्योग आहेत त्यांतला जो आवडेल तो उचला. परंतु जे काही उटलाल त्यात हृदय ओता ; त्याचा अहर्निश जप करा. म्हणजे तो उद्योग तुम्हांला मोक्ष देऊन तुमच्या राष्ट्रालाही मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel